मुंबई : इंदिरा गांधी यांना वगळून देशाचाच नव्हे, तर जगाचा इतिहास कुणालाच लिहिता येणार नाही. पण आपल्या देशातील 'खुज्या' राज्यकर्त्यांना हे सांगणार कोण? असा खडा सवाल शिवसनेचे मुखपत्र सामनातून भाजपला करण्यात आला आहे. 1971 चे बांगलादेशचे युद्ध भारताने जिंकले त्या घटनेस 16 डिसेंबरला पन्नास वर्षे पूर्ण झाली. या ५० व्या विजयी दिनानिमित्त शूर जवानांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले. त्या विजय दिवशी झालेल्या कार्यक्रमात पराक्रमी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे साधे नाव घेण्याचे सौजन्यही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवले नाही. सध्याच्या राज्यकर्त्यांनी इंदिरा गांधींचे नाव घ्यायला भय वाटते की लाज वाटते? असा सवालही सामनातून पंतप्रधान मोदींना करण्यात आलाय.


राज्यकर्त्यास मंदिरे बांधता येतील, पण बांगलादेश निर्माण करता येणार नाही. 


इंदिरा गांधींनी धाडस दाखवले नसते तर पाकिस्तानला जन्माची अद्दल घडविताच आली नसती. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे सरळ दोन तुकडे केले व 1947 च्या फाळणीचा बदला घेतला. हा विजयी दिवस देशाच्या इतिहासातील सुवर्ण क्षणच ठरला. तेव्हाचे जनसंघाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिराजींच्या पराक्रमाचा उल्लेख 'दुर्गा' असाच केला. हिंदुस्थानच्या शौर्यास तेव्हा संपूर्ण जगाने अभिवादन केले. बांगलादेश युद्धातील विजय हा त्यांच्या जीवनातील पराक्रमाचा परमोच्च क्षण ठरला. परंतु त्या वेळीही हिंदुस्थानी सैन्य मागे घेण्याची हिंमत त्यांनीच दाखविल्याचे सामनात म्हटले आहे. इंदिरा गांधी जगातील शक्तिमान नेत्या म्हणून जगासमोर आल्या. हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहाल तर पाकिस्तानचे केले तसे तुकडे तुकडे करू असा संदेशही इंदिरा गांधींनी जगाला दिला. त्या विजयाचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना सध्याच्या राज्यकर्त्यांनी इंदिरा गांधींचे साधे नावही घेऊ नये? इंदिरा गांधींचे नाव घ्यायला भय वाटते की लाज वाटते? असा सवाल सामनातून भाजपला करण्यात आला आहे. इंदिरा गांधी यांनी 1971 चा पराक्रम केला तेव्हा आजचे दिल्लीतील राज्यकर्ते कदाचित गोधडीत रांगत असतील. राज्यकर्त्यांचे मन मोठेच हवे. संकुचित मनाच्या राजाकडून भव्य कामे होत नाहीत. एखाद्या राज्यकर्त्यास मंदिरे बांधता येतील, नद्या साफ करता येतील, इमारती बांधता येतील, पण पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेश निर्माण करता येणार नाही. 


इंदिरा गांधींचा पराक्रम सहन होत नाही...


इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला धडा शिकवायचे ठरविले व सर्जिकल स्ट्राईक वगैरे न करता सरळ हल्लाच केला. पाकिस्तानात सैन्यच घुसवले. हवाई हल्ले केले. नौदलाचा वापर केला. कराची बंदर बेचिराख केले. 16 डिसेंबर 1971 रोजी हिंदुस्थानी लष्करासमोर पाकिस्तानचे 90,000 सैन्य शरण आले. 1971 च्या युद्धातील हिंदुस्थानी सैन्याचा हा पराक्रम 'विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. त्या विजयामागची शक्ती इंदिरा गांधींची होती हे विसरून कसे चालेल? पाकिस्तानचा इतका दारुण पराभव त्यानंतर कधीच कुणाला करता आला नाही. कारगिलचे युद्ध आपल्या भूमीवरच झाले. पाकिस्तानने घुसखोरी केली व त्या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी आमच्या 1 हजार 500 सैनिकांना आमच्याच भूमीवर बलिदान द्यावे लागले. तरीही आपण कारगिल दिवस हा विजय दिवस म्हणून पाळतो. देशाच्या संरक्षणासाठी जवानांनी दिलेले बलिदान विसरता येणार नाही. आज लडाखमध्ये चिनी सैन्य आत घुसलेले आहे. त्याला मागे ढकलणे अद्याप ज्यांना जमलेले नाही त्यांना इंदिरा गांधींचा 1971 चा पराक्रम सहन होत नाही. विजयी दिवशी त्या पराक्रमी महिलेचे नाव घेणेही टाळले जाते हा देशातील नारीशक्तीचा अपमान असल्याचे सामनात म्हटले आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे बांगलादेशातील ढाका येथे विजय दिवस साजरा करण्यासाठी गेले आहेत, पण त्या बांगलादेशची निर्मितीच इंदिरा गांधींमुळे झाली याचा संदर्भही त्यांनी दिला नाही. 1971 चे युद्ध म्हणजे बांगलादेशचा मुक्तीसंग्राम होता. पाकिस्तानच्या मदतीला अमेरिकेचे नौदल निघाले तेव्हा रशियाचे 'आरमार' इंदिरा गांधींच्या साहसाची कवचकुंडले बनून पुढे आले आणि अमेरिकेने माघारच घेतली. संपूर्ण जग या युद्धाकडे थक्क होऊन पाहत होते व एका हिंदुस्थानी महिलेच्या पराक्रमाने अचंबित झाले होते.


1971 च्या युद्धाने, विजयाने जगाच्या नकाशावर हिंदुस्थानची खरी ओळख निर्माण झाली. त्या विजयाच्या महान दिवशी साहसी इंदिरा गांधींचे नाव न घेणे यासारखा नतद्रष्टपणा नाही. काँग्रेस पक्षाशी तुमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद असू शकतात. तरीही देश घडविणाऱ्या नेत्यांविषयी आकस ठेवणे हे सच्च्या हिंदुस्थानीचे लक्षण नाही. इंदिरा गांधींचा पराक्रम विसरणे, बांगलादेश युद्धातील त्यांचे विजयी योगदान विसरणे म्हणजे भारतमातेला विसरणे. 1971 च्या युद्धविजयानंतर राज्यकर्त्यांनी असा कोणताच भीमपराक्रम केल्याची नोंद दिसत नाही. कश्मीर खोऱ्यात निरपराधी लोकांचे व जवानांचे हौतात्म्य आजही सुरूच आहे. सर्जिकल स्ट्राइकचा डंका पिटत निवडणुकीत मते मागितली. पण पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच आहे. अफगाणिस्तान, नेपाळही आमच्या विरोधात गेले आहे. दुष्मन चारही सीमांवर बंदुका रोखून उभा आहे. चीन तर आत घुसलेच आहे. अशा वेळी 1971 च्या बांगलादेश युद्धात इंदिरा गांधींनी मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाचे स्मरण कायम प्रेरणादायी ठरेल. इंदिरा गांधींना श्रेय द्यायचे नाकारले तरी बांगलादेश युद्धाचा विजय त्यांच्याच नावावर नोंदविला जाईल. लहान मनाच्या राज्यकर्त्यांकडून देश महान कसा होणार? असा खडा सवाल सामनातून भाजपला करण्यात आलाय.


महत्त्वाच्या बातम्या :