फलटण : साताऱ्यामधील फलटण तालुक्यातील सरडे गावातील एका मजूर आईवडिलांच्या पोटी जन्मलेल्या प्रवीण जाधव याची ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. पंतप्रधान मोदींनी देखील आज आपल्या मन की बात या कार्यक्रमात साताऱ्याच्या प्रवीण जाधवचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रवीणला क्रीडा प्रबोधिनी अमरावती येथे सिलेक्शन करण्यासाठी प्राथमिक शिक्षक विकास भुजबळ व शुभांगी भुजबळ यांनी अथक प्रयत्न केले. तो धनुर्विद्या खेळाडू म्हणून सुरुवात करताना प्रशिक्षक म्हणून काम केलेले प्रफुल डांगे (क्रिडा प्रबोधनी, अमरावती) त्यानंतर रणजीत चांमले (पुणे) व आत्ता आर्मी इन्स्टिट्यूट पुणे आणि भारतीय धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे या सर्वांचे मार्गदर्शन व प्रवीणचे खडतर प्रशिक्षण यामुळं त्यानं ऑलिम्पिकमध्ये धडक मारली.
प्रवीणचा धनुर्विद्या खेळातील प्रवास अतिशय खडतर असा आहे. परंतु त्याची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आज साताऱ्यातील प्रवीणचा आज ऑलिम्पिकमध्ये डंका वाजणार यात तीळमात्र शंका नाही. घरची परिस्थिती अतिशय बिकट असताना त्याने हे यश मिळवले आहे. प्रवीणने आतापर्यंत दहा वेळा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक देखील प्राप्त केलेली आहेत.
सातारा जिल्ह्यातील अजून खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत पोहोचावेत. मी ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे करु शकलो, तसेच अजून खेळाडू देखील तयार व्हावेत ही त्याची तळमळ अतिशय स्तुत्य आहे.
सातारा जिल्ह्यातील क्रीडा प्रेमी व क्रीडा संघटनांच्या प्रवीणला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
पंतप्रधानांनी मन की बात मध्ये केलं कौतुक
पंतप्रधानांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात साताऱ्याच्या प्रवीण जाधवचं कौतुक केलं. ते म्हणाले की, "जर तुम्ही आमच्या प्रवीण जाधव बद्दल ऐकले तर तुम्हाला पण वाटेल की किती कठीण संघर्षानंतर प्रवीण इथे पोहोचले आहेत. प्रवीण जाधव हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गावात राहतात. ते तिरंदाजीतील उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांचे आईवडील मजुरी करून कुटुंब चालवतात आणि आता त्यांचा मुलगा, आपल्या पहिल्या ऑलिंपिकसाठी टोकियोला जात आहे. ही फक्त त्यांच्या आईवडिलांसाठीच नव्हे, तर आपल्या सर्वांसाठीही अभिमानाची गोष्ट आहे." पंतप्रधान म्हणाले की, "टोकियोला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा संघर्ष आहे.या खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आहे. म्हणूनच मी देशवासियांना सल्ला देऊ इच्छितो, की या खेळाडूंवर आपण कळत-नकळत दबाव आणायचा नाही तर खुल्या मनाने त्यांना पाठिंबा द्यायचा आहे."