मुंबई : रायगडमधील दरड दुर्घटनेत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता एका बाळाचा जीव वाचवताना 14 वर्षीय साक्षी दाभेकरने आपला पाय गमावला. तिने केलेल्या साहसी प्रयत्नामुळे बाळाचे प्राण वाचले मात्र साक्षीला कायमच अपंगत्व आलं. साक्षीने दाखवलेल्या धाडसाची बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर तिला मदतीचा ओघ सुरु झाला आहे. साक्षी दाभेकरची कॅबिनेट बैठकीतही दखल घेतली गेली आहे.
कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साक्षी दाभेकर आणि तिची बहिण प्रतिक्षा दाभेकर या दोन्ही बहिणींना मदत देण्याबाबत विनंती केली. साक्षी दाभेकर आणि प्रतिक्षा दाभेकर या बहिणींच्या शैक्षणिक पालकत्वची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी उचलली आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून साक्षीच्या रुग्णालयातील उपचारासाठी आता 2 लाख रुपये मदत देण्यात येणार असून पुढील शिक्षणाचा खर्च उचलण्यात येणार आहे.
पाय गमावलेल्या साक्षीला सव्वा लाखांची तातडीची मदत, महापौर पेडणेकरांनी रुग्णालयात घेतली साक्षीची भेट
एबीपी माझाने दाखवलेल्या बातमीनंतर मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाकडून साक्षीचा पुढील उपचारासाठीचा संपूर्ण खर्च केला जाणार आहे. तसेच, कृत्रीम पाय बसवण्याची जबाबदारीही मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाने घेतली आहे. सुरुवातीला साक्षीला जयपूर फुट बसवला जाणार आहे. त्यानंतर काही महिन्यांनी जर्मन कंपनीचा ऑटोबोक कंपनीचा सोर्बो रबरचा कृत्रीम पाय बसवला जाणार आहे. याचा खर्च 12 लाखांपर्यंत होणार आहे, याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेनं उचलली आहे. याशिवाव बीएमसी महापौर किशोरी पेडणेकर, आरोग्यसमिती अध्यक्ष, नगरसेवक अनिल कोकीळ यांच्याकडून एकूण सव्वा लाखाची रक्कम तातडीची मदत म्हणून साक्षीच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे.
क्रीडापटू साक्षी दाभेकरच्या स्वप्नावर 'दरड', चिमुरड्याला वाचवताना पाय गमावला, तुमच्या मदतीची गरज...
साक्षीने जीवाची पर्वा न करता वाचवले चिमुकल्याचे प्राण
पोलादपूर तालुक्यातल्या सावित्री खोऱ्यात अतिदुर्गम डोंगरात वसलेलं केवनाळे गावातली साक्षी दाभेकर ही नववीत शिक्षण घेत आहे. साक्षी तालुक्यात उत्तम धावपटू, कब्बडी आणि खोखो खेळणारी खेळाडू म्हणून ओळखली जाते. मात्र, जेव्हा रायगडमध्ये मृत्यूचं थैमान सुरु होतं त्यावेळी एका लहानग्या बाळाला वाचवायला गेलेल्या साक्षीच्या पायावर भिंत पडली आणि तिने तिचा एक पाय कायमचा गमावलाय. साक्षीच्या शेजारच्या चार घरांवर एक दरड कोसळली. त्यावेळी शेजारच्या घरातल्या नवजात बालकाचा टाहो तिने ऐकला आणि साक्षीनं एका उडीतच तिने शेजारच्या उफाळे कुटुंबाचे घर गाठलं आणि समोर दिसणाऱ्या बाळावर ती उपडी पडली. बाळ वाचलं पण, पुढच्याच मिनिटाला साक्षीने सुद्धा जोरात किंकाळी फोडली. त्या घराची अर्धी भिंत तिच्या पायावर कोसळली होती.
साक्षीने योग्य वेळीच झेप घेतल्याने बाळ सुखरुप राहिलं. पण, भिंतीखालचा दबलेला पाय काढला तेव्हा त्याची नस अन् नस तुटलेली होती. उपचारासाठी कुठे न्यावं तर गावात असलेल्या दोनच रिक्षा आणि त्या ही चिखलात रुतलेल्या होत्या. अशा स्थितीत केवनाळे गावातून तीन तास चिखल तुटवत चालतच साक्षीला हाताच्या पाळण्यात घेऊन गावकऱ्यांनी तालुक्याच्या रुग्णालयात पोहोचवलं. मात्र, तिथे उपचार होणं शक्यच नव्हतं. त्यानंतर साक्षीला घेऊन तिच्या नातलगांनी मुंबई गाठली आणि केईएम हॉस्पिटलमध्ये तिला आणलं. साक्षीला या सगळ्यात ऑपरेशन करुनही पाय गमवावाच लागला. सध्या तिच्यावर केईएम रुग्णालयातच उपाचार सुरु आहेत.
साक्षी नारायण दाभेकरला आर्थिक मदत करण्यासाठी बँक तपशील खालीलप्रमाणे आहे.
प्रतीक्षा नारायण दाभेकर
बँक ऑफ इंडिया, पोलादपूर शाखा,
A/C No. 120310510002839
IFSC code - BKID 0001203
MICR - 402013520
संपर्क - 8291813078