Belgaum News Update : बेळगावमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या हट्टापासाठी एका वृद्ध महिलेला चक्क आयसीयूतील बेडसह कार्यालयात आणण्यात आले आहे. महादेवी अगसीमनी (वय 80) असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. खासगी रूग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या या वृद्ध महिलेला सही करण्यासाठी बेळगावातील उपनिबंधक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात बोलवले. सही करण्यासाठी कार्यालयातच यावे लागेल असे सांगितल्यामुळे संबंधित वृद्धेला आयसीयूतील बेडसह कार्यालयात आणावे लागले.
महादेवी या प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात आयसीयूत उपचार घेत आहेत. त्यांच्या नावावर बेळगावातील हिरे बागेवाडी येथे अडीच एकर जमीन आहे. ही जमीन विद्या होसमनी आणि रवींद्र होसमनी यांच्या नावाने करण्यासाठी महादेवी यांना हक्क सोडपत्र करायचे होते. मालमत्ता वाटणी आणि मालमत्ता हक्क करारावर स्वाक्षरी करण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक होते. त्यासाठी महादेवी आगसिमनी यांचा अंगठा आणि सही आवश्यक होती. त्या आयसीयूमध्ये असल्याने उपनोंदणी अधिकाऱ्यांना रुग्णालयात येण्याची विनंती कुटुंबीयांनी केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी या मागणीला नकार देऊन पैशाची मागणी केली. त्यामुळे नातेवाईकांनी आजीला आयसीयूतील बेडसह उपनिबंधक कार्यालयात उचलून आणले आणि सही करून घेतली, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.
व्हिडीओ व्हायरल
आयसीयू बेडसह महादेवी यांना उप निबंधक कार्यालयात आणण्यात आल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून माणुसकी हरवलेल्या उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या कृत्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आपल्या कृत्यातून माणुसकीला काळी फासला असल्याचे मत समाज माध्यमातून व्यक्त होत आहे.
नाकात नळ्या
अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून महादेवी यांना आयसीयू मधील बेडवरून उप निबंधक कार्यालयात आणण्यात आले. यावेळी त्यांच्या नाकात नळ्या होत्या शिवाय त्या अंथरुणावर पडून होत्या. नाकात नळ्या असलेल्या आणि बेडवर असलेल्या अवस्थेतच महादेवी अगसीमनी यांचा उपनिबंधक कार्यालयात फोटो काढून अंगठा आणि सही घेण्यात आली. उप निबंधक अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमधे येऊन आजीची सही, अंगठा आणि फोटो घेण्यासाठी पैशाची मागणी केल्यामुळे नातेवाईकांनी आयसीयू मधील बेडसह त्यांना उप नोंदणी कार्यालयात आणले.
महत्वाच्या बातम्या