मुंबई: राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आजपासून आंदोलन पुकारलं आहे. एकच मिशन, जुनी पेन्शन या घोषणेसह राज्यभर आज विविध ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अभ्यास समिती स्थापन केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्याला विरोध करत शासकीय कर्मचाऱ्यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं आहे. या आंदोलनाचा फटका राज्यातील नागरिकांना बसल्याचं दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यांतील आरोग्य कर्मचारी या आंदोलनात सामील झाल्याने त्या ठिकाणी रुग्णाना हाल सोसावं लागल्याचं चित्र आहे. 


अधिकाऱ्यांचा पाठिंबा, कोणतीही कारवाई करणार नाही


राज्य सरकारने जर आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 28 मार्चपासून राज्यातील दीड लाख राज्यातील राजपत्रित अधिकारी संपावर जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या संपाला राजपत्रित अधिकाऱ्यांचा पूर्णपणे पाठिंबा असून कर्मचारी संपावर गेल्यास अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नसल्याची भूमिका आहे. परिणामी राज्यातील शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. 


राज्यातील आरोग्य व्यवस्था विस्कळीत


आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतल्याने राज्यातील आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी रुग्णांवर उपचार होत नसल्याचं दिसून येत आहे. त्याचा फटका राज्यभरातील नागरिकांना बसत आहे. 


सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी संपावर, रुग्णसेवेवर ताण पडणार


महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशन संघटना सुद्धा आज पुकारलेल्या संपात सक्रिय सहभागी असणार आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयातील रुग्णसेवेवर या संपामुळे मोठा ताण पडणार आहे. यामध्ये तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणीतील सर्व कर्मचारी हे सकाळी साडेसात वाजल्यापासून संपावर गेले आहेत. सरकारी रुग्णालयातील नर्सेस, क्ष किरण विभाग तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपिक वर्ग, सफाई कामगार, कक्षसेवक हे सर्व कर्मचारी संपावर गेल्याने सरकारी रुग्णालयात आरोग्य सेवा ढासळण्याची शक्यता आहे. सरकारी रुग्णालयात सर्व सेवा या डॉक्टर्स त्यासोबतच शिकाऊ परिचारिका आणि निवासी डॉक्टर यांच्यामार्फत सुरू राहतील मात्र या सेवा सुरू असताना इतर कर्मचाऱ्यांची साथ त्यांना आज मिळणार नाही.


वाशिम जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी काढला मोर्चा


राज्य शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आज वाशिम जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. आरोग्य विभागानेही या संपात सहभाग घेतल्याने आरोग्य यंत्रणा विस्कळित झाली आहे. संप पुकारलेल्या कर्मचाऱ्यांकडून मोर्चा काढण्यात आला. 


ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सरकार विरोधात घोषणाबाजी


जुन्या पेन्शनसाठी सर्व कर्मचारी एकजुटीने संपामध्ये सामील झाले आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हजारोच्या संख्येने कर्मचारी निदर्शन करत आहेत.  सरकार जोपर्यंत जुनी पेन्शन लागू करणार नाही तोपर्यंत असाच संप सुरू राहणार असल्याचा सरकारी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यामुळे नागरिकांना मोठा फटका बसत आहे. 


रत्नागिरी जिल्ह्यात 15000 कर्मचारी संपावर


जुनी पेन्शनसाठी रत्नागिरी जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. परिणामी जिल्ह्यातल्या सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये सध्या मनुष्यबळाची कमी जाणवत आहे. जिल्ह्यातल्या सर्व तहसील कार्यालयासमोर कर्मचारी एकत्र गोळा झाले असून जोरदार घोषणाबाजी करत आहेत. आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोवर माघार नाही अशी भावना हे कर्मचारी बोलून दाखवत आहेत. जिल्ह्यात 15000 कर्मचारी संपात सहभागी झाले असून आपत्कालीन परिस्थितीसाठी पोलीस आणि होमगार्ड  यांची देखील मदत घेतली जाणार आहे. 


बुलढाण्यातील 28500 राज्य सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर


बुलढाणा जिल्ह्यातील 28500 राज्य सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे.


यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांना संपाचा फटका


यवतमाळमध्ये जुन्या पेन्शनसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. आजपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने शासकीय व खाजगी, अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली आहे. तर काही शाळेतील शाळा शिक्षकांविना सुरू आहे.


राहुरी कृषी विद्यापीठात आंदोलन


जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आज सुरू झालेल्या बेमुदत संपात राहुरी कृषी विद्यापीठातील कर्मचारीही सहभागी झाले आहेत. एकच मिशन जुनी पेन्शन अशी घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन दिले आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांसह  कृषी विद्यापीठातील कर्मचारीही बेमुदत संपावर गेल्याने विद्यापिठातील कामकाज ठप्प झालं आहे.


बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारला संप


जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी राज्यभरातील प्रशासकीय सरकारी कर्मचारी हे संपावर गेले आहे. यामध्ये बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रशासकीय कर्मचारी देखील या संपामध्ये सहभागी झाले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ही लोकं काम करत असतात मात्र जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील या कर्मचाऱ्यांनी देखील संप पुकारला आहे.. त्यामुळे या कार्यालयात चालणाऱ्या प्रशासकीय काम बंद झालं आहे


कोकण भवन मध्ये जुनी पेन्शन लागू करण्यासाठी काम बंद आंदोलन


नवी मुंबई कोकण भवन कर्मचार्‍यांनी जुनी पेन्शन मागणी संदर्भात व इतर मागण्या संदर्भात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. याबाबत राज्य शासनाला पूर्व कल्पना असूनही काल सुकानू समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये यावर कोणताही तोडगा न निघाल्याने आज पासून राज्यातले जवळपास 17 लाख हुन अधिक कर्मचारी संपामध्ये उतरले असून हा संप शंभर टक्के यशस्वी झालेला आहे . त्याचबरोबर या संपाला अधिकारी महासंघाचा देखील पाठिंबा असून अधिकारी महासंघ देखील जर हा संप असाच कायम राहिला तर दिनांक 28 मार्चपासून सर्व अधिकारी वर्ग महासंघ या संपामध्ये सामील होणार आहेत.


ज्यांना शिक्षणाची अट नाही त्यांना का पेन्शन? आरोग्य संघटनेचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी जिल्ह्यातील कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ज्यांना शिक्षणाची अट नाही अशा लोकप्रतिनिधींना पेन्शन देण्यात येते, आम्ही तर शासकीय सेवेत 30 ते 35 वर्षे काम करतो तरीपण पेन्शन का नाही तो तर आमचा हक्क आहे. आमचा हक्काचा पैसा शासन म्युचल फंड, शेअर्स मार्केटमध्ये टाकते आणि अदानी सारखे लोक ते घेऊन पळतात असं या संघटनेनं म्हटलं आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आमची महाराष्ट्र सरकारी कर्मचारी महासंघ स्थापन केली आणि म्हणूनच आम्ही भगवी टोपी घालून हे आंदोलन करीत आहोत असं या आंदोलकांनी म्हटलं आहे.


जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा: ॲड. प्रकाश आंबेडकर 


जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्यभर सरकारी कर्मचारी आंदोलन करत असताना त्याला वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. ते म्हणाले की, "भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये पेन्शन स्कीम बंद करण्यात आली. बंद करते वेळेस आम्ही त्यांना सांगितलं होतं की वीस वर्षानंतर याचे परिणाम आपल्याला दिसायला सुरुवात होतील. आज ते परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. शासकीय कर्मचाऱ्याने जुनी पेन्शन स्कीम सुरू करावी म्हणून आंदोलनाला सुरुवात केली आहे. कामगारांच्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे. पेन्शन चालू झाली पाहिजे ही आमची सुद्धा मागणी आहे. काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला यामुळे काँग्रेस पक्षाचेही आम्ही अभिनंदन करतो. पेन्शन स्कीम लागू झाली पाहिजे यासाठी आपण लढताय त्याबद्दल पक्षाच्या वतीने शुभेच्छा!"