Odisha Train Accident: बालासोर येथील रेल्वे अपघातामुळे संपूर्ण देश  हादरला. बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात अनेकांचे जीव गेल्यानंतर रेल्वेच्या सुरक्षा प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यात मोठा गाजावाजा करत रेल्वेने जी कवच सुरक्षा प्रणाली निर्माण केली. भारतीय रेल्वेच्या इतिहासात एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन समोरासमोर आल्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत.त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वेगवेगळ्या सुरक्षा प्रणाली निर्माण केल्या गेल्या. त्यातली सर्वात अत्याधुनिक म्हणजे कवच सुरक्षा प्रणाली. ही सुरक्षा प्रणाली संपूर्ण रेल्वे मार्गांवर कार्यान्वित करण्यात येणार होती मात्र अजूनही महाराष्ट्रातील एकाही रेल्वे मार्गावर ही प्रणाली कार्यान्वित नसल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. 

Continues below advertisement


महाराष्ट्रात मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या पाच झोनच्या रेल्वे धावतात. त्याचे रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात एकूण 5861 किमीचे रेल्वेचे जाळे आहे. मात्र अजूनही यापैकी एक किलोमीटरच्या रेल्वे लाईनवर देखील कवच प्रणाली बसवण्यात आलेली नाही अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. महाराष्ट्र काय तर संपूर्ण भारतात देखील अजून कवच ही प्रणाली अस्तित्वात नाही. बालासोर येथील रेल्वे अपघातानंतर ही प्रणाली कुठे कुठे बसवण्यात आली याबद्दल प्रश्न विचारले गेले. तेव्हा रेल्वे बोर्डाने  माहिती दिली आहे.


रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार


संपूर्ण भारतात 68 हजार किमीपेक्षा जास्त मोठे रेल्वेचे जाळे आहे. यापैकी केवळ दक्षिण मध्य रेल्वेच्या 1455 किमी रेल्वे मार्गावर सध्या कवच ही प्रणाली बसवण्यात आली आहे. इतरत्र कुठेच ती कार्यान्वित नाही. तर दिल्ली मुंबई आणि दिल्ली हावडा सेक्शन वरील 2951 किमीच्या रेल्वे मार्गावर कवच प्रणाली बसवण्यासाठी कंत्राट काढण्यात आले असून हे काम 2024 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. तसेच जास्त वाहतूक असलेल्या 35736 किमी रेल्वे मार्गावर कवच प्रणाली बसवण्यासाठी परवानगी मिळाली आहे. 


या व्यतिरिक्त सध्या महाराष्ट्रसह भारतात इतर काही सुरक्षा प्रणाली अस्तित्वात आहेत. जसे की ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग, जी सध्या 3600 किमी रेल्वे मार्गावर कार्यरत आहे, यासोबत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम देखील बसवण्यात आली आहे जी सध्या 2572 स्टेशनवर कार्यान्वित झालेली आहे. तर मुंबईसारख्या शहरात ए डब्ल्यू एस नावाची सिस्टीम बसवण्यात आली आहे. 


हे ही वाचा :


 ''कवचमुळे रेल्वे अपघात टाळता येईल'', रेल्वेमंत्र्यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, विरोधक आक्रमक; नक्की काय आहे ही यंत्रणा?