Indian Railways : भारतीय रेल्वेने 2017-18 आणि 2021-22 दरम्यान सुरक्षेच्या उपायांवर एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केले आहेत. तसंच या कालावधीत रेल्वे रुळाच्या देखभाल-दुरुस्तीवरील (Track Renewal) खर्चात सातत्याने वाढ पाहायला मिळाली. अधिकृत दस्तऐवजांमधून याबाबत माहिती मिळाली आहे. 


ओदिशामधील बालासोर ट्रेन दुर्घटनेबद्दल केंद्राला लक्ष्य करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी दाखला दिलेल्या CAG अहवालाला रेल्वेकडून लवकरच उत्तर दिलं जाईल, असे संकेत सरकारमधील सूत्रांकडून मिळत आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे रेल्वेच्या सुरक्षेबाबतचे सर्व पोकळ दावे उघड झाल्याचं म्हटलं. तसंच रेल्वेच्या सुरक्षेमधील घसरणीबाबत लोकांमध्ये चिंतेचं वातावरण असल्याचंही ते म्हणाले. 


खरगे यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं की 2022 च्या CAG अहवाल 'Drailment in Indian Railways' मध्ये राष्ट्रीय रेल सुरक्षा कोष (RRSK) च्या निधीमध्ये 79 टक्क्यांची मोठी घसरण असल्याचं नमूद केलं आहे. अर्थसंकल्प सादर करताना वर्षाला सुमारे 20 हजार कोटी रुपये उपलब्ध होतील, असा दावा करण्यात आला होता, मात्र तसं झालं नाही.


सुरक्षेवर भारतीय रेल्वेचा खर्च 


1) राष्ट्रीय रेल सुरक्षा कोष (RRSK)निधी -
2017 मध्ये, सुरक्षा कार्याकरता अव्यय (Non-Lapsable) खर्चासह 1 लाख कोटी रुपयांच्या निधीसह स्थापना आणि रेल्वेने 2017 ते 2022 पर्यंत सुरक्षेच्या कामांवर 1 लाख कोटींहून अधिक खर्च केले आहेत.


2) ट्रॅक नूतनीकरण
ट्रॅक नूतनीकरणाचा खर्च सातत्याने वाढला आहे. 2017-18 मध्ये खर्च 8,884 कोटी होता, 2021-22 मध्ये खर्च 16,558 कोटी झाला आहे. गेल्या 5 वर्षात रेल्वेने यावर 58,045 कोटी रुपये खर्च केले आहेत.


यूपीए सरकारच्या कार्यकाळात म्हणजेच वर्ष 2004-2005 ते 2013-14 मधील 47,039 कोटींच्या तुलनेत मोदी सरकारच्या कार्यकाळात म्हणजेच 2014-15 ते 2023-24 पर्यंत ट्रॅक नुतनीकरणावर एकूण 1,09,023 कोटी खर्च झाला आहे.


3) पूल, लेव्हल क्रॉसिंग गेट्स, ROB/RUB, सिग्नलिंग कामे यांसारख्या सुरक्षेशी संबंधित कामांवरील खर्च -
वर्ष 2004-05 ते 2013-14 या कालावधीत 70,274 कोटी खर्चाच्या तुलनेत 2014-15 ते 2023-24 या कालावधीत 1,78,012 कोटी खर्च करण्यात आला आहे.


ओडिशामधील भीषण रेल्वे अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू


तत्पूर्वी ओडिशाच्या (Odisha) बालासोरमध्ये (Balasore) तीन ट्रेन एकमेकांवर आदळल्याने मोठा अपघात झाला. यामध्ये 288 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक हजाराहून अधिकजण गंभीर जखमी आहेत. सध्या या अपघाताची सखोल चौकशी सुरु आहे. सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचं रेल्वे बोर्डाने लोको पायलटच्या हवाल्याने म्हटलं आहे.