मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे. या मुद्द्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरुन भाजपने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं. प्रमुख नेत्यांच्या नेतृत्त्वात विविध जिल्ह्यात चक्काजाम आणि जेलभरो आंदोलन करण्यात आलं. मुंबईत आशिष शेलार, खासदार मनोज कोटक तर पुण्यात पंकजा मुंडे, नागपुरात देवेंद्र फडणवीस आंदोलनात सहभागी झाले.


मुलुंड इथल्या आनंदनगर टोलनाक्यावर भाजप नेते आशिष शेलार, खासदार मनोज कोटक यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम करण्यात आला. यानंतर पोलिसांनी आशिष शेलार यांच्यासह सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. पुण्यात माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आलं. पिंपरीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात चक्काजाम आंदोलन झालं. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आंदोलन रद्द झाली, अशी टीका त्यांनी केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.


गोंदियात शेकडो बैलगाड्या घेऊन भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर 
गोंदियात ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपने सडक अर्जुनीतून भव्य बैलगाडी मोर्चा काढून कोहमारा इथल्या मुंबई-हावडा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्ग 6 वर हजारो भाजप कार्यकर्त्यानी महामार्ग रोखून धरला. माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो बैलगाड्या ग्रामीण भागातून ओबीसी कार्यकर्त्यानी आंदोलनाला मोठ्या संख्येने हजेरी लावली. राज्य सरकार ओबीसींचे आरक्षण हिरावण्यासाठी कारणीभूत असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी आंदोलक नेत्यांनी केले.


चंद्रपुरात ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपचे चक्काजाम आंदोलन
चंद्रपुरात ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपने आज ठिकठिकाणी चक्काजाम केले. चंद्रपूर-नागपूर आणि चंद्रपूर-यवतमाळ मार्गावर पडोली चौकात हजारो भाजप कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला. भाजप नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे पडोली चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर हंसराज अहिर यांनी वरोरा येथे तर चिमूर येथे भाजप आमदार बंटी भांगडिया यांनी चक्काजाम केला. ग्रामीण भागातून ओबीसी कार्यकर्त्यानी आंदोलनाला मोठ्या संख्येने हजेरी लावली. राज्य सरकार ओबीसींचे आरक्षण हिरावण्यासाठी कारणीभूत असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी आंदोलक नेत्यांनी केले. इंपेरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर न करता राज्य सरकार आणि सत्ताधारी पक्ष अकारण केंद्र सरकारवर तोंडसुख घेत असल्याचा भाजप नेत्यांनी यावेळी आरोप केला.


OBC Reservation : आमच्या हाती सत्ता द्या, चार महिन्यात आरक्षण देतो अन्यथा राजकीय संन्यास घेतो: देवेंद्र फडणवीस


भिवंडीत भाजपाचे चक्काजाम आंदोलन काही काळ वाहतूक विस्कळीत 
ओबीसी आरक्षणा संदर्भात राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी भाजपने राज्यात चक्का जाम आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार भिवंडी शहरातील वर्दळीच्या कल्याण नाका परिसरात भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा ओबीसी विभागाने चक्का जाम आंदोलन केले .या आंदोलनात सहभागी स्त्री पुरुष कार्यकर्त्यानी रस्त्यावर बसकण मारल्याने या परिसरातील वाहतूक काही काळ खोळंबली होती. तर मुंबई नाशिक महामार्गावरील राजनोली नाका या ठिकाणी खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले .या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने मुंबई नाशिक महामार्गावर दोन ते तीन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या . सुमारे अर्धा तास आंदोलन सुरु होता त्यामुळे महामार्गावर काही काळ खोळंबा झाला होता. आंदोलन संपल्यावर पोलिसांनी आंदोलकांना पांगवीत वाहतूक सुरळीत केली आहे.


नवी मुंबईत चक्काजाम करणाऱ्या भाजपा नेत्यांना अटक
ओबीसींचे रद्द झालेले राजकीय आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी आज भाजपाने राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन केले. नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. पनवेल ध्ये भाजपा आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी रास्ता रोको केला. यावेळी मुख्य चौकात ठिय्या देत राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी भजोआ नेत्या चित्रा वाघ यांच्या सह सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत वाशी पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे सरकार ने त्वरित योग्य तो निर्णय घेत ओबीसींचे आरक्षण परत मिळवून द्यावे अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी दिला आहे.


वर्ध्यात भाजपचं रास्तारोको आंदोलन, वाहनधारकांच्या हॉर्नचा आवाजही भारी
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी वर्ध्याच्या बजाज चौकात भाजपच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. खासदार रामदास तडस, जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे यांच्या नेतृत्त्वात भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. दरम्यान, रास्ता रोकोमुळे थांबावं लागलेल्या वाहनचालकांनी पुढे जाण्याकरता हॉर्न वाजवले. यावेळी आंदोलकांच्या आवाजात हॉर्न आवाजही भारी ठरताना ऐकू येत होता. सुमारे अर्धा ते पाऊण तास हे आंदोलन सुरु होतं. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे. पण, यावेळी वाहनचालकांनी मोठ्या प्रमाणात वाजवलेले हॉर्न लक्षवेधक ठरले. हे हॉर्न समर्थनात होते की विरोधात, हा प्रश्न येथे उपस्थित झाला.


परभणीत भाजपकडून 16 ठिकाणी चक्काजाम आंदोलन
ओबीसी आरक्षणासाठी परभणी जिल्ह्यात आज भाजपकडून तब्बल 16 ठिकाणी चक्का जाम आंदोलन सुरु आहे. परभणी शहरातील महाराणा प्रताप चौकात महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वात तर जिंतुर शहरातील अण्णा भाऊ साठे चोकात भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. सकाळी 11 वाजल्यापासून हे आंदोलन जिल्ह्याभरात सुरु असल्याने औरंगाबाद-नांदेड, परभणी-वसमत, गंगाखेड-परभणी या प्रमुख राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वच ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


ओबीसी आरक्षणप्रश्नी भाजपतर्फे रक्षा खडसे यांच्या नेतृत्वात जळगावात चक्काजाम आंदोलन 
ओबीसींना आरक्षण मिळण्यासंदर्भात भाजपतर्फे राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. जळगाव शहरातही खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वात मुंबई-नागपूर महामार्गावर आकाशवाणी चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी निदर्शने करण्यासाठी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. ओबीसी आरक्षण संदर्भात रक्षा खडसे यांनी सत्ताधारी आघाडी सरकारवर टीका करताना म्हटल की, "आमचं सरकार होतं तोपर्यंत ओबीसींना आरक्षण ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो होतो. मात्र आमचं सरकार गेल्यानंतर आघाडी सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले नाही आणि हे आरक्षण कायमस्वरुपी राहण्यासाठी सरकारने न्यायालयात पुरेसे अवश्यक ते पुरावे सादर करणे गरजेचे होते. मात्र ते न केल्यामुळेच हे आरक्षण ओबीसींना मिळण्यात अडचणी आल्या आहेत. याला सत्ताधारी पक्ष जबाबदार आहेत. मात्र आरक्षण मिळणे हा ओबीसींचा हक्क आहे आणि त्यासाठी आमचा लढा सुरुच राहणार असल्याचेही खासदार रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.


भाजपचं धुळ्यात रास्ता रोको आंदोलन
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्याचा निकाल दिला असल्याचा आरोप करत धुळे जिल्हा भाजपच्या वतीने चाळीसगाव चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनस्थळी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, दरम्यान या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 


कल्याण-डोंबिवलीत ओबीसी आरक्षणासाठी भाजपचं चक्काजाम आंदोलन
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आवयाने राज्यभरात राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीमध्ये देखील कल्याण शीळ रोडवर भाजपतर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. डोंबिवली पूर्वेकडील टाटा पवार येथे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आला तर कल्याण पूर्वे सूचक नाका येथे आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आले.


मालेगावच्या चाळीसगाव फाट्यावर भाजपचं आंदोलन
सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले ओबीसी राजकीय आरक्षण परत मिळावे या मागणीसाठी भाजपच्यावतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून मालेगावमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. मालेगावच्या चाळीसगाव फाट्यावर भाजप कार्यकर्त्यांनी माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक पवार आणि सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-आग्रा महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. यावेळी शेकडो कार्यकर्ते हातात विविध मागाण्यांचे फलक घेऊन सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्यातील आघाडी सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरले असून मराठा आरक्षण देऊ शकले नाही तर ओबीसींचे राजकीय आरक्षणही टिकवू शकले नाही. सरकार फक्त हफ्ते जमा करण्यात मश्गुल आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत तोपर्यंत आम्ही राज्य सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा यावेळी जयकुमार रावल यांनी दिला. मालेगावसह मनमाड आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले.


बारामतीतील तीन हत्ती चौकात भाजपचं आंदोलन
आज राज्यभरात ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील गेलेलं आरक्षण परत मिळावे या मागणीसाठी राज्य सरकार विरुद्ध आंदोलन सुरु आहेत. आज बारामतीत देखील आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी बारामती भिगवण रस्ता काही काळासाठी रोखण्यात आला. हे आंदोलन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर होणार होतं. तिकडे जात असतानाच पोलिसांनी आंदोलकांना अडवलं म्हणून याआंदोलकांनी बारामतीतील तीन हत्ती चौकात आंदोलन केले. तर दुसरीकडे पुरंदर तालुक्यातील जेजुरीत देखील भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. पुणे-पंढरपूर महामार्गावर भाजपच्या वतीने सरकारच्या विरोधात आंदोलन केले.


बाराबलुतेदारांना घेऊन सांगलीत गोपीचंद पडळकर यांचे चक्काजाम
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरुन आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आज सांगलीतील पुष्पराज चौक येथे भाजपने चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनात बहुरुपी, गोंधळी, पोतराज, वाघ्या मुरळी, उवरी-गडशी, सुतार, कुंभार, लोहार, वासुदेव, गुरव, हेळवी, डोंबारी, गोसावी यासह अनेक अठरापगड जातीचे बाराबलुतेदार आपापली वेशभूषा परिधान करुन आंदोलनात सहभागी झाले होते. या चक्काजाम आंदोलनात भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सांगली-मिरज रोडवरील पुष्कराज चौकात चक्काजाम आंदोलन केलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.