CM Eknath Shinde नाशिक : जालन्यातील वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) हे गेल्या 10 दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने हाके आणि वाघमारे यांची भेट घेतली. शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेअंती लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण स्थगित केले. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर होते. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी (Nashik Teachers Constituency Election 2024) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत. महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) यांच्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकांचा धडाका लावला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाबाबत भाष्य केले आहे. 


मुख्यमंत्र्यांनी मानले लक्ष्मण हाकेंचे आभार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,  काल बैठक झाली होती. कालच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतरही सर्वजण उपस्थित होते. समाजा-समाजात तेढ निर्माण होवू नये, यासाठी चर्चा करण्यात आली. मराठा आणि ओबीसी समाजात वाद होवू नये, यासाठी चर्चा झाली. अधिवेशनाच्या काळात काही मुद्द्यांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचे ठरवण्यात आले आहे. लक्ष्मण हाके यांनी आंदोलन मागे घेतले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 


प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडिलांनंतर शिक्षकचे महत्त्व : एकनाथ शिंदे


नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी आलो आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडिलांनंतर शिक्षकचे महत्त्व आहे. देशाची सुजाण सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम शिक्षक करतो. ही निवडणूक सर्वांसाठी महत्वाची आहे. शिक्षकांमध्ये मोठी ताकद असते. लोकसभा निवडणुकीत काही चुका आहेत. पण, मागील पराभवाचे उट्टे काढण्याची संधी आपल्याला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करू. हे सरकार शिक्षकांचे आहे. शिक्षकांना नेहमी खुश ठेवले पाहिजे. शिक्षक म्हणजे एलआयसीसारखे नोकरीत असताना आणि निवृत्त झाल्यानंतरही शिक्षक कामाचे असतात, असे त्यांनी म्हटले आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या