Solapur: वीज निमिर्ती करताना कोळसा वापरल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात सल्फर डायऑक्साईड गॅसची निर्मिती होते. चिमणी द्वारे हे वायू हवेत सोडले जाते. सल्फर डायऑक्साईड हे वायू विषारी असल्याने त्याचा पर्यावरणावर मोठा परिणाम होत असतो. वीजनिमिर्ती करताना निर्माण होणारे हे सल्फर डायऑक्साईड कमी करण्यासाठी सोलापूर एनटीपीसीतर्फे नवा प्रकल्प उभारला जातोय. डिसेंबर 2022 पर्यंत हे प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून यासाठी 500 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती सोलापूर एनटीपीसीचे  मुख्य व्यवस्थापक एन. एस. राव यांनी दिली. 


सोलापुरातल्या फटातेवाडी येथे असलेल्या एनटीपीसी येथे 2 वीज निर्मिती प्रकल्प सुरु आहेत. ज्याद्वारे 1 हजार 320 मेगा वॅट वीजेची निर्मिती केली जात आहे. यातील जवळपास 85 टक्के वीज ही महाराष्ट्रातच वापरली जाते. वीज निर्मिती करताना कोळशाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने प्रदुषणाची मोठी शक्यता असते. पर्यावरणाची हीच हाणी टाळण्याचे प्रयत्न सोलापूर एनटीपीसीतर्फे केले जाणार आहेत. 


सल्फर डायऑक्साईड उत्सर्जनासाठी साधारण 100 mg/Nm3 इतकी मर्यादा असते. मात्र सध्या सोलापूर एनटीपीसीमध्ये 400 ते 500 mg/Nm3 सल्फर डायऑक्साईड हवेत उत्सर्जित केला जातोय. पर्यावऱणाच्या दृष्टीने हे प्रमाण 2024 पर्यंत कमी करण्याच्या सुचना शासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. मात्र त्यापूर्वीच डिसेंबर 2022 मध्ये हे प्रकल्प उभारले जाणार असल्याची माहिती एनटीपीसीतर्फे देण्यात आली. उत्सर्जित केले जाणारे हे सल्फर डायऑक्साईड प्रकल्पामुळे शोषित केले जाणार आहे. 


कोळशाच्या काही प्रमाणात तुटवडा जाणवला, मात्र वीज निर्मिती सुरूच राहिली


संपूर्ण देशभरात कोळशाचा तुटवडा जाणवतो ही बाब खरी आहे. मात्र सोलापूर एनटीपीसने व्यवस्थित नियोजन केले. WCL, SECL, NCL इत्यादी ठिकाणी सोलापूर एनटीपीसीचे प्रतिनिधी पाठवून कोळसा आणला जात आहे. आम्हाला दररोज साधारण 4 रॅक कोळशाची आवश्यकता आहे. सध्या 3 ते 4 रॅक कोळसा आम्हाला उपलब्ध होत आहे. त्यामुळे आम्ही सातत्याने वीज निर्मिती करत आहोत. सध्यस्थितीत वीज निर्मितीमध्ये आम्हाला कोणतीही अडचण नाही. स्थानिक पातळीवर कोळसा कमी असल्याने आम्ही कोळसा बाहेरून देखील मागवत आहोत. मात्र त्यामुळे दरात कोणताही फरक पडलेला नाही, अशी प्रतिक्रिया एनटीपीसीचे सोलापूरचे मुख्य व्यवस्थापक एन. एस. राव यांनी दिली.