यापूर्वीच बाधित रुग्णांच्या डिस्चार्जचा कालावधी कमी करण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील जाचक नियम आणि अटी बदलल्या गेल्या आहेत. यात आता आणखी बदल करण्यात आला आहे. जे रुग्ण बाधित आहेत, मात्र त्यांना लक्षणे नाहीत किंवा अतिसौम्य लक्षणे आहेत, अशा रुग्णांना आता घरीच विलगीकरण कक्षात राहू देण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.
नव्या नियमावलीमुसार तीन प्रकारे वर्गीकरण
नव्या नियमावलीनुसार तीन प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे. लक्षणं नसलेले, सौम्य आणि अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र लक्षणांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र लक्षणांमध्ये यामध्ये कोविड केअर सेंटर (सीसीसी), डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी), डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) येथे दाखल करावयाचे आहे.
अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना जर त्यांचे घरामध्ये योग्य प्रकारे सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय (होम आयसोलेशन) उपलब्ध करून देता येणार आहे.
अशा आहेत सूचना
- उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णास अतिसौम्य किंवा लक्षणे नसल्याबदल वैद्यकीय दृष्ट्या प्रमाणित केलेले असावे.
- रुग्णाच्या घरी अलगीकरणासाठी योग्य सोयीसुविधा उपलब्ध असाव्यात.
- घरी दिवस-रात्र काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असावी.
- संबधित काळजीवाहू व्यक्ती व उपचार देणारे रुग्णालय यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था (दूरध्वनी/मोबाईल) उपलब्ध असणे अनिवार्य आहे.
- वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार प्रोटोकॉलनुसार हायड्रॉक्सिक्लोरोक्विनची मात्रा घ्यावी.
- मोबाईलवर आरोग्य सेतू' ॲप डाउनलोड करावे व ते सतत ॲक्टीव्ह असावे.
- रुग्णांनी स्वत:ची काळजी घेणे व नियमितपणे प्रकृतीबाबत पाठपुराव्या विषयी जिल्हा सर्वेक्षण अधिकारी, सर्वेक्षण पथकास माहिती देणे अनिवार्य आहे.
- रुग्णाने स्वत: गृह विलगीकरण करण्याविषयी प्रतिज्ञापत्र भरून द्यावे व सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
गृह विलगीकरण कधीपर्यंत
गृह विलगीकरणात ठेवलेल्या व्यक्तीला लक्षणे सुरू झाल्यानंतर १७ दिवसांनंतर किंवा रुग्णाला लक्षणे नसतील, तर चाचणीसाठी नमुना ज्या दिवशी घेतलेला असेल, तेथून १७ दिवसांनंतर आणि मागील १० दिवसांपासून ताप येत नसेल, तर गृह विलगीकरणातून व्यक्तीस मुक्त करावे. गृह विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर परत कोविड-१९ साठी चाचणी करण्याची आवश्यकता नाही.