मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (Ajit Pawar NCP) सर्व प्रवक्त्यांनी महायुतीबाबत बोलताना पक्षनेतृत्वाची मान्यता घेऊनच बोलण्याची ताकीद देण्यात आली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांना ही नोटीस जारी केली आहे. महायुतीत जागावाटपाच्या आकड्यासंबंधी वाद सुरू झाल्यानंतर सर्व प्रवक्त्यांना या सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांकडून काही वक्तव्यं होत होती त्यावर नाराजीचा सूर दिसत होता. महायुतीमध्ये खरोखरच काही बिनसलंय काय अशा चर्चाही सुरू झाल्या. लोकसभेच्या निकालानंतर आता विधानसभेच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरही चर्चा सुरू झाली. त्यावरून अजित पवार गटाच्या काही प्रवक्त्यांकडून करण्यात आलेल्या वक्तव्यांवर महायुतीमधून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
हीच गोष्ट लक्षात घेता आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सर्व प्रवक्त्यांना एक नोटीस जारी केली आहे. महायुतीसंदर्भात कोणतंही वक्तव्य करण्यापूर्वी वरिष्ठ नेत्यांची चर्चा करावी अशा सूचना त्यातून देण्यात आल्या आहेत.
जागावाटपावरून ज्या काही चर्चा सुरू आहेत त्यावर कोणतंही वक्तव्य, वरिष्ठांच्या मान्यतेशिवाय करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशाचे पालन आता सर्व प्रवक्त्यांना करावं लागणार आहे.
नोटीस नव्हे तर नियमित पत्र, उमेश पाटलांचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, याला नोटीस म्हणता येणार नाही. हे एक नियमित पत्र आहे. कुणाकडून काही चूक होत असेल किंवा आपल्या कामाच्या बाबतीत काही बदल करावा लागत असेल तर पक्षाचे अध्यक्ष नेहमीच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतात.
पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्यावरून उत्तरास प्रत्युत्तर देण्यामुळे महायुतीतील इतर पक्षांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, वाद निर्माण होऊ नये यासाठी सर्वच पक्षांकडून खबरदारी घेण्यात येते. त्यामुळे हा कुणावरही व्यक्तिगत ठपका नाही, प्रत्येकजण आपापल्या आकलनानुसार बोलत असतो. त्यामुळे कुणाचाही अपमान व्हावा असा हेतू नसतो.
जागावाटपाच्या वक्तव्यावरून वाद
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींच्या वक्तव्यांमुळे भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. अमोल मिटकरींनी महायुतीतील घटक पक्षांवर केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. अमोल मिटकरींचे तोंड आवरा असं भाजपचे प्रवक्ते प्रवीण दरेकरांनीही म्हटलं होतं.
ही बातमी वाचा: