NEET Exam Paper Leak Case: नीट परीक्षांमधील (NEET Exams) घोटाळ्यानं सर्वांना हैराण केलं आहे. दिवसागणित या प्रकरणात अनेक नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच नीट घोटाळ्याचे (NEET Scam Case) धागेदोरे लातूरातही (Latur News) सापडले आहेत. लातूरातील जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणातील आणखी तीन आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच याच प्रकरणातील आरोपीच्या पत्नीनं खळबळजनक दावा केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी गंगाधरला उत्तराखंड पोलिसांनी मंगळवारी (25 जून, 2024) ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. 


गंगाधर यांच्या पत्नीनं एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, "माझ्या पतीला 25 जून रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी ताब्यात घेण्यात आलं. यानंतर मी त्यांच्याशी बोलू शकले नाही, माझा नवरा सध्या कुठे आहे हे मला माहीत नाही. तो हिरो कंपनीत कामगार म्हणून काम करतो. मला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काहीही माहिती नाही."


गंगाधरवर नेमके आरोप काय? 


नीट पेपरफुटी प्रकरण संपूर्ण देशभरात गाजलं. या प्रकरणाचं जाळं संपूर्ण देशभरात पसरल्याचं पाहायला मिळालं आहे. देशभरात विविध ठिकाणी याप्रकरणी कारवाई सुरू आहे. अशातच आतापर्यंत समोर आलेल्या प्रकरणांमध्ये गंगाधर मुख्य सूत्रधार असल्याचं बोललं जात आहे. 


गंगाधर गुंडे बिहारमधील काही लोकांच्या संपर्कात होता आणि नीट पेपरफुटी घोटाळ्यात त्याचा मोठा हात असल्याचा आरोप आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार, सीबीआयनं नुकतीच 5 मे रोजी झालेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG मधील कथित अनियमिततेच्या संदर्भात एफआयआर नोंदवला होता. तेव्हापासून केंद्रीय तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. अलीकडेच बिहारमधील पाटणा येथील न्यायालयानं या प्रकरणातील दोन आरोपी बलदेव कुमार उर्फ ​​चिंटू आणि मुकेश कुमार यांना सीबीआय कोठडीत पाठवलं होतं.


लातूर पेपरफुटी प्रकरणातही गंगाधरचं नाव समोर 


पोलीस कोठडीत असलेला जलील  पठाण आणि संजय जाधव यांनी नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची बरीच माहिती पोलिसांना दिली. गेल्या 3 ते 4 वर्षांत पठाण आणि जाधवसारखे अनेक एजंट लातूर जिल्हा आणि मराठवाड्यातही कार्यरत आहेत. त्यांनी जे पैसे जमा केले, त्या विद्यार्थ्यांचे गुणही वाढवून देण्यात आल्याचा दावा या दोघांनी केला आहे. इतकंच नव्हे तर इतर सरकारी नोकर भरती प्रक्रियेतील परीक्षेतही हे रॅकेट सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपी शिक्षक जाधव आणि पठाण यांच्याकडून पैसे घेऊन ते दिल्लीपर्यंत पोहोचवणारा उमरगा, आयटीआयमधील सुपरवायझर इरन्ना कोनगलवार आणि दिल्लीतील एजंट गंगाधर हे तीन आरोपी अद्याप फरार आहेत. गंगाधर हा मूळचा मराठवाड्याचा असून उत्तराखंडमध्ये लपून बसला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Latur Paper Leak Case: मोठी बातमी! नीट पेरफुटीचं रॅकेट लातूरपर्यंत मर्यादित नाही, जिल्ह्याजिल्ह्यात पसरलंय सबएजंट्सचं जाळं; दोन आरोपी शिक्षकांची कबुली