नागपूर : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं नाव आता बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ करण्यात आलं आहे. यासाठी विधानसभेत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधयेक 2018 एकमताने मंजूर करण्यात आलं.

1990 ला विद्यापीठाची स्थापना झाली, गेली अनेक वर्षे कवयित्री बहिणाबाई यांचे नाव विद्यापीठाला द्यावे अशी मागणी होत होती. बहिणाबाईंच्या जयंतीदिनी म्हणजे 11 ऑगस्टला नामविस्तार सोहळा होणार आहे.

सोलापूर विद्यापीठाचं काय?

सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. ही घोषणा का केली माहीत नाही पण यामुळे दोन समाजात तेढ निर्माण झाली, असा आरोप ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी केला.

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय न घेता बहिणाबाईंचं नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला देण्यासाठी जसे विधेयक आणले तसे विधेयक न आणता ही घोषणा का केली? ही घोषणा जाणूनबुजून केली, की नकळत केली याचा खुलासा सरकारने करायला हवा, अशी मागणी गणपतराव देशमुख यांनी केली.

शिवाय सोलापूर विद्यापीठाला लवकरात लवकर अहिल्याबाई होळकर यांचं नाव द्यावं, अशी मागणीही गणपतराव देशमुख यांनी केली.

गणपतराव देशमुख यांच्या प्रश्नावर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उत्तर दिलं. समाजात फूट पाडण्याचं काम आम्ही करत नाही. सोलापूर विद्यापीठाच्या नामकरणासाठी एक उपसमिती नेमली आहे. शिवा संघटनेनेही आता सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्यासाठी पाठिंबा दिला आहे. उच्च न्यायालयात एक खटला सुरू आहे, त्याचा निकाल आला की नाव दिलं जाईल, असं विनोद तावडे म्हणाले.