नागपूर : ज्यांना चाबकानं फोडलं पाहिजे अशा आरोपींना यवतमाळ पोलिसांनी चिकन, मटणाची पार्टी दिल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. काही नागरिकांनी या पार्टीचे फोटो काढत सोशल मीडियावर व्हायरल केल्याने हा प्रकार उघडकीस आला.
गोळीबार आणि दरोडा अशा गंभीर गुन्ह्यात अटकेत असलेल्या अनिकेत गावंडे, शुभम बघेल आणि आशिष दांडेकर यांना यवतमाळ पोलिसांच्या पथकानं शुक्रवारी रात्री नागपूरला नेलं. तेव्हा रस्त्यात बुटीबोरी भागातल्या खालसा ढाब्यावर तिन्ही सराईत गुंडांना चिकन, मटण आणि हवं त्या पदार्थांची पार्टी देण्यात आली.
काही नागरिकांनी या पार्टीचे फोटो काढत सोशल मीडियावर व्हायरल केलेत. त्यानंतर यवतमाळ पोलिसांची इभ्रत चव्हाट्यावर आलीय.
यवतमाळच्या माळीपुरा भागात राजकुमार प्रजापती यांच्यावर गोळीबार आणि तलवार हल्ला केल्याचाही या तिघांवर आरोप आहे. तसंच दरोड्य़ाच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी आरोपींना अटक केलीय. मात्र अशा अट्टल गुन्हेगारांवर पोलीस का मेहेरबान झालीय, हा सवाल विचारला जातोय.