सांगली : "सांगली, मुंबई, पुणे, पालघर, औरंगाबाद यांसह अन्य जिल्हे रेड झोनमध्ये गेलेले नसून तसा निर्णय अद्याप झालेला नाही. केंद्र अथवा राज्य सरकारने असे कोणतेही झोन घोषित केलेले नाहीत, पुढील आठवड्यात यासंदर्भात केंद्र सरकारच्या परवानगीने निर्णय होईल," असं स्पष्टीकरण कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिलं आहे. सांगलीतील शिवभोजन थाळी आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णाचा आढावा विश्वजीत कदम यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिलनंतरही लॉकडाऊन कायम राहणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर कोरोना रुग्ण संख्येनुसार राज्याची रेड, ऑरेंज आणि ग्रीन या तीन झोनमध्ये विभागणी केली जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु अद्याप असे कोणत्याही प्रकारचे झोन सरकार किंवा प्रशासनाकडून केलेले नाहीत, असं विश्वजित कदम यांनी सांगितलं आहे.


कोरोनाबाधितांच्या संख्येनुसार महाराष्ट्राची रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमध्ये विभागणी



केंद्र सरकारने अजून रेड, ऑरेंज, ग्रीन झोन ठरवले नाहीत. पुढील आठवड्यात याबाबतीत केंद्र सरकारच्या परवानगीने निर्णय होईल. झोनिंगच्या बाबतीत प्रत्येक राज्य सरकारने आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन केंद्र सरकारची परवानगी घेऊन तो निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे लोकांनी पॅनिक न होता लॉकडाऊनचं पालन करावं, असं आवाहनही विश्वजित कदम यांनी केलं आहे.

महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी होणार?
देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात असल्याने सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. त्यानुसारच कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे, अशी चर्चा आहे. 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे रेड झोन, 15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोन समाविष्ट होतील. लॉकडाऊनसंदर्भात रेड झोनमधील जिल्ह्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांमध्ये खबरदारीची उपाययोजना करुन उद्योग आणि व्यवहार सुरु केले जातील असे संकेत मिळत आहेत.





कोणते जिल्हे कोणत्या झोनमध्ये?


रेड झोन : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सांगली, नागपूर, औरंगाबाद


ऑरेंज झोन : रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोंदिया


ग्रीन झोन : सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली


भाजपने राजकारण थांबवावं : विश्वजीत कदम
महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कोरोनाला रोखण्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करत आहे. परंतु भाजपकडून मदतीच्या वाटपावरुन जे राजकारण केलं जातंय ते भाजपने थांबवावं. देश, राज्य संकटात सध्या संकटात आहे. अशावेळी राजकारण न करता जे जे महाराष्ट्रसाठी करता येईल ते केलं पाहिजे असंही कदम यांनी सांगितलं.


Red, Orange, Green Zone | कोरोनाच्या प्रभावानुसार जिल्ह्यांची विभागणी, रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन,तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्ये?