लातूर: भीषण दुष्काळातून सावरणारा चाकूर तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. पावसानं दडी दिल्यानं पीकं करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घामाची माती झाली असून, उभ्या पिकात नांगर फिरवण्यावाचून शेतकऱ्यांपुढे पर्याय उरलेला नाही.



चाकूर तालुका हा कोरडवाहू तालुका म्हणून ओळखला जातो. खरिपाच्या मोसमात तालुक्यात सर्वात जास्त पेरा हा सोयाबीनचा केला जातो. सोयाबीनसोबत मूग, उडीद ही पीकंही घेतली जातात. शिवाय जानवळ परिसरात टोमॅटोचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. पण जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसानं पाठ फिरवल्यानं शेती आणि शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत.

जूनमध्ये चांगला पाऊस झाल्यानं पेरा वाढला. पीकंही चांगली आली. पण पावसाने ऐनवेळी दडी दिल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी पीकं वाचवली. पण उत्पन्नात मोठी  घट होणार आहे. सरकारकडून पंचनामे करण्याचे आदेश आलेले नाहीत. पण आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचं चाकूर तालुक्याचे तहसीलदार भारत सूर्यवंशी यांनी सांगितलं.



पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनू शकतो. कारण तालुक्यातील प्रकल्पांमध्ये पाण्याचा अत्यल्पसाठा आहे. पावसाळ्याचे उरलेले दिवस आणि परतीचा पाऊस यावरच पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे. एकूणच पाऊस पडला नाही तर दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.