मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये खातेबदल होण्याची कोणतीही शक्यता नाही, काही जणांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या वावड्या उठवण्याचं काम सुरु असल्याचं राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना सांगितलं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नेहमीप्रमाणेच चर्चा झाली असल्याचंही जयंत पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं. 


जयंत पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, "सरकारमध्ये कोणताही खातेबदल होण्याची चर्चा नाही, त्यामुळे कोणीही वावड्या उठवू नये. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याचं कोणतंही कारण नाही. ते आपलं काम व्यवस्थित करत आहे. त्यामुळे असा कोणताही प्रस्ताव पक्षासमोर नाही." 


सचिन वाझे प्रकरणावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "सरकार ठाम मताचं आहे. कोणी काही चुका केल्या असतील किंवा कोणी एखाद्या प्रकरणात सहभागी असेल, तर त्यात कोणाचीही बाजू घेण्याचा प्रश्न नाही. तसेच तसा विचारही सरकारमध्ये कोणीही करत नाही." पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "सचिन वाझे प्रकरणावर गृहमंत्र्यांनी कोणतीही चूक केलेली नाही. सचिन वाझे यांना एनआयएनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ज्या गोष्टी एनआयएच्या तपासातून समोर येतील, त्यामध्ये कोणीही दोषी आढळलं तर त्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. हिच सरकारचीही भूमिका आहे. सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही."


"एखाद्या घटनेचा तपास एनआयए करत आहे. त्यांनी त्या गुन्ह्याचा तपास केलाय, एटीएसदेखील तपास करत होतं. त्यांचाही तपास सुरु होता. पण दरम्यानच्या काळात एनआयएच्या हातात तो तपास गेला आहे. या प्रकरणातील ज्या बाबी एनआयएच्या समोर आल्या, त्याचप्रमाणे त्यांच्या समोरही येत असतील. त्यामुळे पुढिल तपासात त्यांना जी माहिती मिळेल, त्यानुसार पुढे कारवाई होईल." असं जयंत पाटील म्हणाले. 


मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये आज झालेल्या बैठकीबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "सरकारसमोर वेगवेगळ्या राज्यांचे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या राज्यांचे विषय आहेत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत असतात. त्यांच्याशी चर्चा करत असतात." पुढे बोलताना ते म्हणाले की, "सरकारमधील खातेबदलाबाबत कोणताही प्रश्न नाहीये. कोणत्याही परिस्थितीत असे बदल करण्याची आवश्यकता नाहीये." गृहमंत्रीपदासाठी जयंत पाटील, अजित पवार यांच्या नावाची चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "नावं अनेकांची चर्चेत येऊ शकतात. नावं आली म्हणजे खातेबदल होईल असं नाही. तसेच अशी नावांची चर्चा करण्याची आवश्यकताही नाही. आमचे गृहमंत्री अनिल देशमुखचं राहणार. अशा वावड्या उठवण्याची ही पद्धत आहे. तुम्हाला हिरवा कंदिल, यांना हिरवा कंदिल. मला वाटतं व्यवस्थितपणे काम सुरु आहे. त्यामुळे त्यामध्ये बदल करण्याची आम्हाला खातेबदल करण्याची आवश्यकता वाटत नाही."


महत्त्वाच्या इतर बातम्या :