मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. यामुद्द्यवारुन विरोधकांकडून ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व घडामोडींदरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सचिन वाझे यांच्यासह राज्यातल्या विविध मुद्द्यांवर या बेठकीत चर्चा झाली.  मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात तब्बल एक तास ही चर्चा झाली. 


सचिन वाझे प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सचिन वाझे प्रकरणावरुन विरोधकांकडून शिवसेनेला सातत्याने टार्गेट केलं जात आहे. तर राष्ट्रवादीने मात्र या प्रकरणात सावध भूमिका घेतली आहे. सुशांतसिंग प्रकरणानंतर पुन्हा एकदा मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. त्यामुळे विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाली असावी असा अंदाज आहे. 


Antilia Bomb Scare: सीसीटीव्हीत दिसलेली पीपीई किट घातलेली व्यक्ती सचिन वाझे असल्याचा NIA ला संशय


आजच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात किंवा पोलीस खात्यात काही बदल होतात की हे पाहावं लागेल. सरकारने अद्यापही यावर कोणतीही भूमिका मांडलेली नाही.  सरकारचं डॅमेज कन्ट्रोल कसं करायचं यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आज दुपारी 4 वाजता महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सचिन वाझे प्रकरणी शरद पवार वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचंही कळतंय. 


Exclusive : ...म्हणून सचिन वाझेंना अटक, इनोव्हाच्या नंबर प्लेटचा झोल? CCTVमधून महत्वाची माहिती 


सचिन वाझेंच्या अटकेवरुन 'सामना'तून टीकास्त्र


पोलिस अधिकारी  सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. आता शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या पोलीस दलाची क्षमता व शौर्य याची वाहवा जगभरात असताना 20 जिलेटिनच्या कांड्यांसाठी केंद्रीय तपास पथकाने मुंबईत यावे , हे आश्चर्यच आहे, असं सामनात म्हटलं आहे. सचिन वाझे यांचे काही चुकलेच असेल व 20 जिलेटिन कांड्यांत ते गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास मुंबई पोलीस, दहशतवादविरोधी पथक सक्षम होतेच, पण केंद्रीय तपास पथकाला ते होऊ द्यायचे नव्हते. त्यांनी वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला आहे. हे सर्व ठरवून घडवले जात आहे. वाझे यांना अटक करून दाखवली , याचा आनंद जे व्यक्त करीत आहेत ते राज्याच्या स्वायत्ततेवर घाला घालीत आहेत. सत्य लवकरच बाहेर येईल, असंही लेखात म्हटलं आहे.


Antilia Explosives Scare | अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवणारा संशयित सीसीटीव्हीत कैद