पुणे : अजून चैत्र महिना सुरु झाला नसला तरी राज्यात वैशाख वणवा पेटलेला दिसून येतो आहे. मात्र, राज्यातील या तापमानाला हिट वेव्ह म्हणता येणार नाही, असे पुणे वेधशाळेने स्पष्ट केले.
ज्या ठिकाणचं सामान्य तापमान 40 अंश सेल्सिअस असतं, तिथल्या तापमानात साडेचार ते साडेसहा अंश सेल्सिअसची वाढ झाली, तर त्यालाच तांत्रिकदृष्ट्या हिट वेव्ह म्हणता येतं. त्यामुळे राज्यातल्या तापमानाला हिट वेव्ह म्हणता येणार नाही, असे पुणे वेधशाळेने सांगितले.
आताची परिस्थिती सामान्य आहे. विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात एखाद-दोन ठिकाणी हीट वेव्ह सारखी परिस्थिती आहे. मात्र, तिथेही उद्यानंतर परिस्थिती निवळेल असेही पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे.
पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, केरळ, तमिळनाडू, ईशान्य भारत, बिहार, उत्तर प्रदेशात हलक्या पावसाची चिन्ह आहे. मात्र, महाराष्ट्रात आवश्यक तेवढी आर्द्रता नाही, त्यामुळे ढग तयार झाले तरी पावसाची शक्यता नाही.
राज्यातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांचं तापमान 40 अंशांच्या वर पोहोचलं आहे. तर उरलेल्या शहरांचं तापमानही 35 ते 40 अंश सेल्सिअसदरम्यान आहे. अकोल्यात सर्वाधिक 43.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव, मालेगाव, नाशिक, सांगली आणि सोलापूरमध्येही पारा 40 अंशाच्या पुढं गेला आहे.