Covid Vaccination शनिवारी भारतात जगातील सर्वाधिक मोठ्या अशी लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली. पण, महाराष्ट्रातून लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी एक वेगळी बातमी समोर आली. लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुमारे 18 हजार 338 हून अधिक म्हणजे सुमारे 64 टक्के कर्मचाऱ्यांना लस देण्यात आल्यानंतर लसीकरणाच्या मोहिमेत तांत्रिक अडचणी आल्याचं निदर्शनास आलं. परिणामी रविवार आणि सोमवारी लसीकरण रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती सर्वांचं लक्ष वेधून गेली. ज्यावर राज्यातील आरोग्य विभागानं अत्यंत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे.


कोरोना लसीकरण प्रक्रियेत नोंदणीसाठी केंद्रानं विकसित केलेल्या कोविन अॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे उद्या मुंबईसह महाराष्ट्रातील लसीकरण रद्द करण्यात आलं असं म्हणत सोमवारी (18 जानेवारी) लसीकरण होण्याची शक्यता कमी आहे, असं वृत्त समोर आलं. ज्यानंतर आता लसीकरणाच्या सुरुवातीलाच असा गोंधळ झाल्यामुळं याबाबतच्या काही चर्चांनीही जोर धरला.


COVAXIN : कोवॅक्सिनच्या लसीकरणानंतर साईड इफेक्ट झाला तर भारत बायोटेक देणार भरपाई


दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभागानं अत्यंत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. 'रविवार 17 जानेवारी आणि सोमवार 18 जानेवारी या दोन्ही दिवसांसाठी कोणत्याही प्रकारच्या लसीकरणाची आखणीच करण्यात आली नव्हती. त्यामुळं लसीकरण रद्द करण्याचा प्रश्नच उभा राहत नाही', असं राज्यातील आरोग्य विभागानं सांगितलं. शिवाय पुढील आठवड्यामध्ये केंद्राच्याच मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरणाची आखणी करण्यात येणार असल्याही सांगण्यात आलं. त्यामुळं लसीकरण रद्द झालं नसून, मुळात या दोन दिवसांसाठी या मोहिमेची आखणीच नव्हती हीच बाब आता लक्षात येत आहे.





आठवड्यातून चार दिवस लसीकरण


केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार एका आठवड्यातील चार दिवसांमध्ये लसीकरण मोहिम राबवली जाऊ शकते. त्यामुळं राज्यांमध्येही त्यानुसारच लसीकरणाचं वेळापत्रकही तयार करण्यात आलं असून, त्याचाच अवलंब केला जात आहे.


ओडिशा लसीकरण रद्द करणारं पहिलं राज्य


ओडिशा हे असं पहिलं राज्य ठरलं आहे, जिथं कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा पहिल्याच दिवसानंतर थांबवण्यात आला आहे. ओडिशा प्रशासनानं लसीकरणाची ही मोहिम रविवारच्या दिवसापुरती थांबवली असून, पहिल्या दिवशी लस घेतलेल्यांच्या निरिक्षणासाठी त्यांनी हा वेळ दिला आहे.