कोल्हापूर : कोरोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ म्हणजे, कोरोना विरोधातील लढाईचा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज असून ही लसीकरण मोहीम राज्यात प्रभावीपणे राबविली जाईल, असे सूतोवात राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं. तसेच केंद्र शासनाने कोरोना विरोधातील लस मोफत देण्याच्या यादीत दारिद्र रेषेखालील घटकांचा समावेश प्राधान्याने करावा अशी मागणी राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी केली आहे.


काल कोल्हापूर जिल्ह्यातील कोविशिल्ड या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरोळ ग्रामीण रुग्णालयामधून करण्यात आला.



कोविशिल्ड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ हा एक आनंददायी आणि भावनिक क्षण असून राज्यातील आरोग्य यंत्रणेसह अत्यावश्यक सेवेतील कोरोना योद्धांची आठवण मला यानिमित्ताने होत आहे, त्यांचे योगदान फार मोठे आहे. ते विसरून चालणार नाही. त्यामुळेच आरोग्य यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना ही लस प्राधान्याने देणं आमचं कर्तव्य होतं आणि त्याची परिपूर्ती आम्ही करत आहोत. माझ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील हे समाधान दर्शविणारा हा एक भावनिक क्षण आहे, असं यड्रावकर यावेळी बोलताना म्हणाले. आता टप्प्याटप्प्याने विविध यंत्रणेतील घटकांपर्यंत ही लसीकरण मोहीम पोहोचेल आणि कोरोना विरोधातील ही लस युद्धातील ढालीसारखे काम करेल, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, तसेच राज्यातील लसीकरण मोहीम केंद्रावरील परिस्थितीचा आढावा घेत घेत संबंधित अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या.


या कार्यक्रमा वेळी माजी आमदार उल्हास पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह माने, जिल्हा परिषदेचे सदस्य अशोकराव माने, पंचायत समितीच्या सभापती कविता चौगुले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंभोजकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दातार, शिरोळचे नगरसेवक यांच्यासह विविध मान्यवर आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :