आपल्या कुटुंबातील अथवा नातेवाईकांसाठी गडकरी यांनी कधीही पक्षाकडं तिकीट मागितलं नाही. याच गोष्टीवर नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी 'एबीपी माझा'शी खास बातचीत केली.
प्रश्न: तुमच्या तीनही मुलांनी आजवर निवडणुकीसाठी तिकीटं मागितलेली नाही, यामागची नेमकी भूमिका काय?
उत्तर: राजकारण जरी रक्तात असलं तरीही स्वत:चं कर्तृत्व दाखविल्याशिवाय आणि त्याला लोकमान्यता मिळाल्याशिवाय ती व्यक्ती समाजात उभं राहू शकत नाही. तसं पाहिलं तर माझी मुलं अजून लहान आहेत. त्यामुळे त्यांनी पहिले समाजकारण करावं, आपला बिझनेस साभाळावं, त्यांनी स्थिर व्हावं, समाजाची सेवा करावी. नंतर जर त्यांना वाटलं तर त्यांनी राजकारणात जावं. पण वडिलांचं बोट धरुन राजकारणात जाऊ नये!, स्वतंत्र अस्तित्व स्थापन करावं, समाजसेवा करावी आणि त्यानंतर त्यांनी राजकारणात जावं.
प्रश्न: वडिलांचं बोट धरुन मुलांनी राजकारणात जाऊ नये यावर नितीन गडकरीचं काय मत आहे? याबाबत घरी कधी चर्चा झाली का?
उत्तर: अलबत! चर्चा अशी हसताखेळता झाली आहे. तेव्हा नितीनजी यांनी सांगितलं आहे की, 'मी जेव्हा राजकारणात काही घराणेशाहीतून आलेलो नाही. मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा भिंतीला पोस्टर चिटकवली, पत्रकं वाटली. एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्यानंतर हळूहळू मी इथवर पोहचलो. त्यामुळे तुम्ही अशी छोटीछोटी कामं आधी करा मग राजकारणात या.' पण मला वाटत नाही त्यांचे वडील राजकारणात असेपर्यंत तरी ते मुलं राजकारणात येतील. कारण की आज, त्यांचा प्रचंड मोठा बिझनेस आहे तो संभाळणंही गरजेचं आहे.
प्रश्न: तुमच्या मुलीची कधी राजकारणात येण्याची इच्छा होती की?
उत्तर: प्रत्येक माणूस काही राजकारणात येत नाही, पण राजकारणात येण्यासाठी तुमच्यात काही अंगभूत गुण असणं गरजेचं असतं. केतकीच्या अंगी ते सगळे गुण आहेत. पण तिने कधीही राजकारणात येण्याची इच्छा दर्शवली नाही. आमच्या कुटुंबीयांनी निवडणुकीत पडद्याच्या मागे राहून कामं केली आहेत. पण नितीनजींच्या प्रचारासाठी आम्ही सगळे फिरलो. त्यावेळी केतकीनं काही ठिकाणी भाषणंही दिलं. त्यावेळी मला अनेकांनी सांगितलं की, केतकी खूप सुंदर भाषणं देते. त्यामुळे तिच्यात गुण आहे. पण तिनं कधीही राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली नाही.
प्रश्न: मुलं बिझनेस उत्तमपणे पाहत आहेत. पण त्यांनी आता राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली तर तुम्हाला आवडेल का?
उत्तर: या घटकेला तरी आवडणार नाही. कारण सध्या मोठा बिझनेस सुरु आहे. पूर्ती कारखाना सुरु केला आहे. तळागाळातील लोकांसाठी हा कारखाना उभारला आहे. बेरोजगारांना कसा रोजगार देता येईल यासाठी मुलं प्रयत्न करीत आहेत. निखील, सारंग आणि केतकी हे तळागाळातील लोकांसाठी काम करत आहेत. तळागाळातील माणूस सुखी होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे हे स्वप्न जोवर पूर्ण होत नाही तोवर मुलं राजकारण येतील असं वाटत नाही.
प्रश्न: तीन मुलांपैकी कोण राजकारणासाठी जास्त सुटेबल आहे?
उत्तर: माझा मोठा मुलगा सुटेबल आहे. कारण राजकारणात येण्यासाठी जे गुण लागतात ते त्यांच्याकडे आहेत. म्हणजे राजकारणात, डोक्यावर बर्फाचा खडा आणि तोंडात गुळाचा खडा.... असं जे पाहिजे असतं ते त्याच्याकडे आहे. पण सध्या तो बिझनेसमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे सध्या तरी मुलांपैकी राजकारणात कुणी येईल असं मला वाटत नाही.
प्रश्न: तुम्ही किंवा सुनांनी राजकारणात येण्याचा विचार केला आहे का?
उत्तर: मी राजकारणात कधीही येणार नाही. मला कधी कुणी तिकीट देऊ केलं तरीही मी ते नाकारेन. सध्या माझ्या दोन्ही सुनांना या समाजकारणात गुंतलेल्या आहेत. एनजीओच्या माध्यमातून ते आपलं समाजकारण करीत आहेत.
VIDEO: