Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : आपल्या सर्वांच्या जीवनात साहित्याला खूप महत्व आहे. कारण साहित्यातूनच समाज बदलतो. जे समाज जीवन आपल्याला घडवायचं असतं त्याचं प्रतिबिंब साहित्यात असतं. त्यामुळे आपल्या जीवनात शिक्षण, आरोग्य, उद्योग, विकास ही क्षेत्रे जशी महत्वाची आहेत तसेच साहित्य देखील महत्वाचं आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. 96 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. साहित्यिकांनी निर्भिडपणे राष्ट्रहितासाठी आपले विचार परखडपणे मांडायलाच हवेत असं  नितीन गडकरी म्हणाले. मतभेद व्हायलाच हवेत मात्र मनभेद होता कामा नये, असंही ते म्हणाले. 


"साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही याचे मला दुःख आहे. वर्ध्याच्या जनतेने खूप सहकार्य केले म्हणून हे संमेलन यशस्वी झाले. वर्ध्यात संमेलन होत आहे याचा खूप आनंद आहे. ही भूमी महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांची भूमी आहे. याच भूमीत सिंधुताई सपकाळ, पांडुरंग खानखोजे यांच्यासारखे लोक घडले, असे नितीन गडकरी  यांनी यावेळी म्हटले. 


"साहित्याचे आपल्या जीवनात खूप महत्व आहे. पुढच्या पिढीच्या विकासासाठी साहित्यिक देखील विचार करीत असतो. महाराष्ट्रामधील साहित्यिक आणि संत यांच्या विचारांचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. आदर्श व्यक्ती तयार करायचा असेल तर त्याचा संबंध संस्काराशी असतो. संस्कारांचा संबंध साहित्याशी असतो आणि साहित्याचा संबंध विचारांशी असतो. त्यामुळेच माणसाच्या आयुष्यात साहित्याला खूप महत्व आहे, असे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.  


 "व्यक्तिगत जीवनात समाजसेवकांचे विचार आले पाहिजेत. जेव्हा जेव्हा आपण साहित्य वाचतो त्या साहित्यातून आपल्याला हेच मिळाले आहे. मतभेद होऊ शकतात पण मनभेद  व्हायला नको. आजही मतभेद असणाऱ्या माणसाला मान देतो ही आपली परंपरा आहे. जे चांगलं असेल ते त्रिकालबाधित सत्य आहे, ते सामान्य माणसापर्यंत पोहचण्याचं माध्यम म्हणजे साहित्य आहे. यातूनच 21 व्या शतकातला समृद्ध भारत होणार आहे. महात्मा गांधी यांच्या स्वप्नांवर आधारलेले राष्ट्र निर्माण आपल्याला करायचं आहे. विश्वाचं कल्याण झाले पाहिजे हेच आपण म्हणतो, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. 


आपल्या साहित्य आणि कवींकडून शिकण्यासारखं खूप आहे. समाजातील अनेक लोक आपल्याला खूप काही शिकवून जातात. काळाच्या ओघात काल होतं ते आज नसतं आणि आज असतं ते उद्या नसतं. अनेक संतांनी आपल्याला साहित्य दिलं आहे. त्यांचा भावार्थ बदलू शकत नाही. थोर समाज सुधारकांनी समाजसुधारणेचे विचार दिले आहेत. त्यातील भावार्थ बदलू शकत नाही. व्यक्तिगत जीवनात महापुरूषांच्या विचारांचा अवलंब केला पाहिजे. व्यक्ती हा त्याच्या गुणांनी मोठा असतो हेच आपल्याला साहित्यिकांनी शिकवलं आहे, असं गडकरी यांनी यावेळी सांगितले.  


साहित्य आणि राजकारण हा एक वादाचा विषय आहे. या साहित्य संमेलनात असा वाद झाला नाही याचा मला खूप आनंद आहे. विद्वान लोकं जेव्हा मोठ्या संख्येने एकत्र येतात त्यावेळी नक्तीच वाद होतो. राजकारणात 99 लोक फक्त हात वर करतात आणि चार ते पाचच लोक निर्णय घेतात. त्यामुळे लोकशाही व्यवस्थित चालते, अशी विनोदी टिप्पणी यावेळी गडकरी यांनी यावेळी केली.