Cotton Price News: शेतकऱ्यांसाठी पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाने यावेळी शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला असून, औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) अनेक भागांत गेल्या दोन दिवसांत कापसाचा (Cotton) दर 300 रुपयांनी घटल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. तर सतत कापसाच्या भावात  (Cotton Price) घसरण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. 


गेल्या वर्षी कापसाला प्रतिक्विंटल 13 हजारांचा विक्रमी दर मिळाला होता. त्यामुळे यावर्षीही देखील कापसाला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र शेतकऱ्यांचा अंदाज प्रारंभीपासूनच सपशेल चुकला असून सातत्याने दरात घट होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यावर्षी सुरवातीलाच सात हजारांच्या आसपास दर होता. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी भाव वाढतील या आशेने घरातच कापूस साठवून ठेवला होता. अशात काही दिवसांपूर्वी कापसाला 7  हजार 700 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. त्यानंतर गुरुवारी औरंगाबादच्या सोयगावच्या बाजारात या दरात वाढ होऊन 8 हजार 100 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. पण दोनच दिवसांत शनिवारी 300 रुपयांनी पुन्हा दरात घसरण झाली आहे. 


यावर्षी खरिपाच्या सुरवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांना मोठा फटका बसला. याचाच फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसला. ज्यात पिकांची वाढ अपेक्षेप्रमाणे झाली नसून, उत्पन्न देखील घटले आहे. त्यामुळे यावेळी बाजारात कापसाची आवक कमी असल्याने दर चांगला असणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी बांधला होता. त्यात सुरवातीला 7 हजार 700 दर मिळाल्याने तो 13 हजारपेक्षा अधिक जाईल या आशेने शेतकऱ्यांनी कापूस विकलाच नाही. पण आता रब्बीचा हंगाम संपत आला असताना देखील दरात काही वाढ होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सोबतच एवढे दिवस जपून ठेवलेल्या कापसाचं घटलेले वजन याचाही फटका बसण्याची शक्यता आहे. 


शेतकरी संभ्रमात


सुरवातीला 7 हजार 700 रुपयांचा दर मिळाल्याने तो आणखी वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला आहे. त्यातच आता दर वाढत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता पुढेही वाढणार की कायम राहणार याबाबत अंदाज बांधता येत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी संभ्रमात आहे. त्यातच मागील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ झाली होती.  त्यामुळे यावेळी देखील मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ होईल अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थिती नेमकं काय करावे याबाबत शेतकरी चिंतेत आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या: 


Anil Deshmukh : कापसाला प्रतिक्विंटल 10 हजार रुपयांचा दर द्या, अनिल देशमुखांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र