Maharashtra Road Work: रोडकरी म्हणून प्रसिद्ध असलेले केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) महाराष्ट्रातील 2100 कोटींहून अधिकच्या रस्ते कामाला मंजूर दिली आहे. या संदर्भात गडकरी यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. या रस्त्यांमध्ये परभणी, नांदेड, गडचिरोली आणि बारामतीच्या महामार्गाचा समावेश आहे.
कोणत्या रस्त्यांसाठी किती कोटींची मंजूरी?
गडकरी यांनी एका मागे एक असे ट्वीट करत महाराष्ट्रातील कोणत्या रस्त्यांसाठी किती कोटींची मंजूरी देण्यात आली आहे, या संदर्भात माहिती दिली आहे. यातच महाराष्ट्रातील एनएच-160 च्या उंडेवाडी कडे पठार ते देशमुख चौक व धवन पाटील चौक (बारामती) ते फलटण या 33.65 किमी रस्त्याचे 4-लेनमध्ये (पेव्ह्ड शोल्डरसहित) पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी 778.18 कोटींची मंजूरी देण्यात आली आहे. ढवळी ते गडचिरोली रस्त्याच्या एनएच-930 वरील ढवळी ते राजोली, पांधसाळा ते मोहडोंगरी, आंबेशिवणी फाटा ते बोदली आणि मेड तुकुम ते गडचिरोली या 28 किमी लांबीच्या सध्याच्या महामार्गाचे 2L+PS/4 लेनमध्ये पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी 316.44 कोटींची मंजूरी देण्यात आली आहे. एनएच-752 एच च्या चिखली - दाभाडी - तळेगांव - पाल फाटा या 37.260 किमी रस्त्याचे 2-लेन, तसेच 4-लेनमध्ये (पेव्ह्ड शोल्डरसहित) पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी 350.75 कोटींची मंजूरी देण्यात आली आहे.
तसेच एनएच-543 भाम्हापुरी - वडसा - कुरखेचा - कोरची - देवरी - आमगांव रस्ता व लेंधारी पुल या छोट्या पुलाच्या बांधणीला EPC मोडवर 163.86 कोटींसह मंजूरी देण्यात आली आहे. कुरखेडा शहरातील सध्याच्या महामार्गाचे 4-लेनमध्ये पुनर्वसन व अपग्रेडेशन करणे, शंकरपूर – गुरनुली विभागात 2-लेन रस्ता व भुती नाला आणि सती नदीवर मोठे पूल. याशिवाय महाराष्ट्रातील एनएच-753एच वरील भोकरदन ते कुंभारी फाटा आणि राजूर ते जालना विभाग, या 26.07 किमी रस्त्याचे 2-लेन तसेच 4-लेनमध्ये पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी 291.07 कोटींची मंजूरी देण्यात आली आहे. याशिवाय एनएच-161A च्या मुदखेड ते नांदेड विभागातील नांदेड - भोकर - हिमायतनगर - किनवट तसेच माहूर - अरणी रोड या रस्त्याचे 2-लेन तसेच 4-लेनमध्ये (पेव्ह्ड शोल्डरसहित) पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी 206.54 कोटींची मंजूरी देण्यात आली आहे.
अशोक चव्हाण यांनी मानले गडकरींचे आभार
नांदेड जिल्ह्यातील रस्ते कामांसाठी 206.54 कोटी रुपयांची मंजूरी दिल्याने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे. अशोक चव्हाण ट्वीट करत म्हणाले आहेत की, ''नांदेड जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या कामांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन निर्णय घेतल्याबद्दल मी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचा आभारी आहे.''