मुंबई : पोलिसांनो, जास्त मस्ती कराल तर तुमच्या बायकांचे फोनही लागणार नाही अशा ठिकाणी बदली करू... हे शब्द राज्याच्या गृहमंत्र्यांचे किंवा पोलिस महासंचालकांचे नाहीत. तर हे शब्द आहेत ते भाजपचे आमदार नितेश राणे यांचे. सागंलीच्या एका सभेत पोलिसांच्या संरक्षणाच्या गराड्यातच नितेश राणे पोलिसांवरच घसरले. महत्त्वाचं म्हणजे नितेश राणे हे काही पहिल्यांदाच पोलिसांवर घसरले नाहीत. त्यांनी याआधीही पोलिसांना उघड धमकी दिली, त्यांची इज्जत काढली आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना आमदार रवी राणा यांनी चूक केली तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ त्यांची कानउघाडणी केली. आता राज्याचे गृहमंत्री, पोलिस दलाचे प्रमुख आणि नितेश राणेंचे नेते म्हणून फडणवीस त्यांना समज देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


नितेश राणे पोलिसांची बदली करायला निघालेत, तीही अशा ठिकाणी जिथं पोलिसांच्या बायकांचाही फोन लागणार नाही. हे सगळे ऐकून महाराष्ट्राला काही प्रश्न पडलेत आणि ते म्हणजे नितेश राणे हे पोलिस महासंचालक आहेत का? नितेश राणे पोलिस आयुक्त किंवा अधीक्षक आहेत का? आणि नितेश राणे महाराष्ट्राचे गृहमंत्री कधी झाले? असे प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडलेत.


सांगलीच्या पलूसमध्ये शिवशक्ती-भीमशक्ती जनआक्रोश मेळाव्यात नितेश राणेंनी भरसभेत पोलिसांना धमकी दिली. तुम्हाला जर मस्ती आली असेल तर सांगा, तुमच्या बायकांनाही फोन लागणार नाही अशा ठिकाणी बदली करू असं ते म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीसांचं नावही घेतलं. हे सरकार हिंदूंचे आहे, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत असं सांगत त्यांनी ही धमकी दिली. 


पोलिस काही वाकडं करणार नाहीत


बरं, नितेश राणे पोलिसांवर असं वादग्रस्त काही पहिल्यांदाच बोलले नाहीत. याआधीही त्यांची गाडी पोलिसांवर घसरल्याचं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. 27 जानेवारी 2024 रोजी एका सभेत बोलताना नितेश राणे म्हणाले होते की, काही झाल्यानंतर फोन करा, काय करायचं ते विचारायला फोन करू नका. पोलिसांच्या समोर हे सांगतोय. ते माझं काही वाकडं करू शकणार नाहीत. आपला बॉस बसलाय 'सागर' बंगल्यावर.


तर 19 फेब्रुवारी 2024 रोजी नितेश राणे म्हणाले होते की, करू देत पोलिस माझं भाषण रेकॉर्ड. पोलिस जास्तीत जास्त काय करणार? माझा व्हिडीओ काढतील आणि घरी जाऊन बायकोला दाखवतील. आमच्या राज्यात आम्हाला काय करणार? राहायचंय जागेवर? 


पोलिसांच्या कुटुंबाला काय वाटत असेल?


पोलिस जर चुकत असतील तर, नितेश राणेंनी त्याविरोधात नक्कीच आवाज उठवायला हवा. अशा पोलिसांची त्यांनी तशी तक्रारही करावी. कारण नितेश राणे ज्यांना बॉस मानतात, ते त्यांच्याच पक्षाचे देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. पण, उठसूठ ते पोलिसांना धमकी देतात आणि पोलिसांची बायका-पोरं काढतात. आपल्या संरक्षणासाठी जे पोलिस 24 तास राबत असतात, त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल? याचा तरी नितेश राणेंनी एकदा नक्की विचार करायला हवा.


नितेश राणेंचे 'बॉस' काय करणार? 


उठायचं आणि पोलिसांवर हवं ते बोलायचं असं करायला नितेश राणे हे काही पारावरच्या गप्पा मारणारे ऐरेगैरे व्यक्ती नाहीत. सत्ताधारी पक्षाचे आमदार, ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या नारायण राणेंचे ते चिरंजीव आहेत.


अशावेळी एखादा व्यक्ती किती तोलुनमापून बोलेल, किमान पोलिस खात्याबद्दल बोलताना तरी विचार करुन बोलेल अशी अपेक्षा असते. पण नितेश राणे अशा अपेक्षांना अपवाद आहेत. ते सतत पोलिसांवर घसरत असतात. खेदाची बाब म्हणजे पोलिसांवर घसरताना नितेश राणे त्यांचे नेते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा वापर करतात.


राणांना झापलं, राणेंना कधी?


आपल्याला मतं दिली नाहीत तर लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेऊ असं वक्तव्य अगदी गमतीने आमदार रवी राणा यांनी केलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी जाहीर सभेतून त्यांची कानउघडणी केली होती. आता राज्याचे गृहमंत्री, पोलिस दलाच्या कुटुंबाचे प्रमुख आणि भाजपचे राज्यातील सर्वशक्तिमान नेते म्हणून देवेंद्र फडणवीस हे नितेश राणेच्या वक्तव्यावर त्यांना समज देणार की नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे कानाडोळा करणार हे पाहवे लागेल. 


ही बातमी वाचा: