सातारा : बारामतीकडे वळवलेल्या नीरा देवाघरच्या पाण्यावरुन सुरु झालेला संघर्ष आता दोन राजघराण्यांपर्यंत येऊन पोचला आहे. पिसाळलेली कुत्री असतील तोपर्यंत मीही पिसाळलेलाच राहणार, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह खासदार रणजित निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली आहे.
नीरा देवघरचे पाणी बारामतीकडे वळवण्यात रामराजे निंबाळकर यांनी पवारांना साथ दिली. तसेच त्या भागातील अनेक जमिनी लाटल्या, असा गंभीर आरोप उदयनराजे आणि खासदार रणजित निंबाळकर यांनी केले होते. या सर्व टीकेला रामराजे निंबाळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
उदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच असल्याचा टोला रामराजे निंबाळकरांनी लगावला. आपल्यावर जमीन लाटण्याचा आरोप करणाऱ्यांनी जवळीमध्ये काय केले हे आम्हाला माहित नाही का? असा सवाल उपस्थित केला. तसेच एक टन पुराव्याची कागदे आपल्याकडे असल्याचा इशाराही त्यांनी उदयनराजेंना दिला.
आम्हाला बांडगुळ म्हणणाऱ्यांनी त्यांच्या आधीच्या छत्रपतींची पिढी आमच्या पिढीनेच सांभाळली याची जाणीव ठेवा. तुमचा आणि माझा दोघांचाही राज्याभिषेक घरातच झाल्याने आपण दोघेही स्वयंघोषित राजे असल्याचे उत्तर रामराजेंनी दिले. मी लाल दिव्याच्या गाडीतून फिरलो तर तुमच्या पोटात का दुखतंय, तुम्हीही दोन वर्षे लाल दिव्याच्या गाडीत फिरुन काय केले, असा सवाल रामराजेंनी विचारला.
मी असे अनेक आमदार, खासदार अंगावर घेतले आहेत, त्यामुळे माजी ऊर्जा वाढतच गेली. आमदार खिशात आणि हे दोन खासदार मी माझ्या काखेत घेऊन फिरतो असा टोलाही त्यांनी लगावला. साताऱ्याच्या राजकीय क्षितीजावर जोवर हे तीन पिसाळलेली कुत्री असतील तोपर्यंत मीही पिसाळलेलाच राहणार असल्याचं रामराजेंनी म्हटलं. त्यामुळे दुष्काळी भागाचे बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा दुष्काळी भागाला देण्याच्या भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर आता राजघराण्यात उडालेला भडका अधिकच टोकाला जाऊ लागला आहे.
उदयनराजेंनी काय आरोप केले होते?
नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरुन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला होता. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. स्वतःच्या स्वार्थासाठी 14 वर्ष पाणी बारामतीला पळवलं. जमिनी लाटण्यासाठी काहींनी लोकांना पाण्यापासून दूर ठेवलं, असा गंभीर आरोप त्यांनी केले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे असंही उदयनराजेंनी म्हटलं होतं.
काय आहे वाद?
माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजित निंबाळकर यांनी निवडून येताच सांगोला येथील दुष्काळी बैठकीत नीर देवघर धरणाच्या पाण्याबाबत आवाज उठवत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाण्याची मागणी केली होती. त्यानंतर बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा उजव्या कालव्यातील दुष्काळी भागात वळवण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. या दुष्काळी भागात सांगोला, माळशिरस, पंढरपूर फलटणला या भागांचा समावेश येतो. आता पुन्हा एकदा 1954च्या कायद्यानुसार हे पाणीवाटप करण्याचा मोठा निर्णय भाजप सरकारने घेतला. बारामतीला वळवलेले दुष्काळी भागाच्या हक्काचे पाणी पुन्हा एकदा या भागाला मिळणार असल्याने या भागातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून त्यांची तहान भागणार आहे.
आणखी वाचा
- बारामतीला पाणी देताना यांना लाज वाटली नाही, ह्यांना रस्त्यावर जोडे मारले पाहिजेत : रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा रामराजेंवर हल्लाबोल
- छत्रपती असल्यासारखं वागा, सूर्याजी पिसाळासारखं वागू नका, रामराजे नाईक निंबाळकरांचा उदयनराजेंवर निशाणा
- बारामतीकरांनी 14 वर्षे नीरेचं पाणी पळवलं, उदयनराजेंची रामराजे निंबाळकर आणि शरद पवारांवर टीका