नाशिक : नाशिकमध्ये काल मुथूट फायनान्सवर पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील आरोपींच्या गाड्या पोलिसांना नाशिक-गुजरात मार्गावर रामशेज किल्ल्याजवळ डोंगराच्या पायथ्याशी सापडल्या आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे. दरोडेखोरांनी लाखो रुपयांची लुटून केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता.

तीन पल्सर बाईक पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. काही स्थानिकांनी काल दुपारपासून तीन बाईक तिथे उभ्या असल्याची माहिती पोलिसांना आज सकाळी दिली. त्यानंतर काही वेळातच तीन पोलिस उपायुक्तांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

या बाईकचे चेसी नंबर गायब असल्याचं समोर आलं आहे. वाहन सोडून दरोडेखोरांनी पळ काढला असून तेही लवकरच पकडले जातील, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. पोलिसांची दहा पथकं तैनात करण्यात आली आहेत.

नाशिकच्या उंटवाडी परिसरातील मुथूट फायनान्समध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा पडला होता. शुक्रवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास दरोडेखोरांनी गोळीबार करुन लाखो रुपयांचा ऐवज लुटला होता. रिव्हॉल्वरसह आलेल्या चौघा दरोडेखोरांनी अडवणूक करणाऱ्यांवर गोळ्या झाडल्या होत्या.

VIDEO | नाशिकमध्ये मुथूट फायनान्सवर सशस्त्र दरोडा, गोळीबारात ऑडिटरचा मृत्यू



दरोडेखोरांच्या हल्ल्यात ऑडिटर संजू सॅम्युअल यांच्या शरीरात तीन गोळ्या घुसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर कैलास जैन आणि राजू देशपांडे जखमी झाले आहेत.

पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील स्वत: घटनास्थळी दाखल झाले होते. दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार करुन दरोडा पडल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.