मुंबई : 'माझा'च्या कट्ट्यावर आलेल्या अनेक नामवंत पाहुण्यांना बोलतं करणारे एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर आजच्या कट्ट्याचे प्रमुख पाहुणे होते. त्यांची मुलाखत खासदार संजय राऊत यांनी घेतली. 'माझा'च्या 14 वर्षांचा चमकदार फ्लॅशबॅक या कट्ट्याच्या माध्यमातून समोर आला. 'माझा'च्या बातमीत लोकांना विश्वासार्हता वाटते, हेच यश असल्याची भावना यावेळी मुख्य संपादक राजीव खांडेकरांनी व्यक्त केली.


कोणतंही माध्यम हे त्याच्या संपादकासोबत मोठं होत असतं आणि संपादक जर स्थिर असेल तर ते माध्यम आणि संपादक एकच चेहरा बनतो. तसा राजीव खांडेकर हा ब्रॅन्ड बनल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. 


आपल्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा देताना राजीव खांडेकर म्हणाले की, "सांगलीतील आटपाडी या मूळ गावानं मला घडवलं. आणिबाणी काळात शाळेत असताना आजूबाजूच्या राजकीय घडामोडींनी उत्सुकता वाढवली आणि त्याला वर्तमानपत्रांनी खतपाणी घातलं. त्याच वयात कुठेतरी पत्रकारितेमध्ये करियर करावं असं ठरवलं."  


पत्रकारितेत येताना डोळ्यासमोर कोण आदर्श होते असा प्रश्न विचारला असता राजीव खांडेकर म्हणाले की, "त्यावेळी माझ्यासमोर महाराष्ट्र टाईम्सचे संपादक गोविंदराव तळवळकर आणि गवा बेहेरे हे दोन आदर्श होते. तळवळकरांचे अग्रलेख मी रोज वाचायचो. या दोघांच्याही लेखणीतील तिखटपणा हा समान धागा होता. तळवळकरांचे लेखन शेवटपर्यंत वाचलं."


पहिली बायलाईन आली त्यावेळी काय भावना होती असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला. त्यावेळी राजीव खांडेकर म्हणाले की, "माझी पहिली बायलाईन बातमी ही दलित मुलांच्या त्याच्या शिष्यवृत्तीसंबंधी होती. त्यावेळी समाजकल्याण खात्यात मोठा भ्रष्टाचार झालेला होता. त्या पहिल्या बायलाईचा मोठा आनंद झाला होता."


प्रत्येक घटना काहीतरी शिकवते. काही जणांनी कसं वागायचे तर काही जणांनी कसं वागायचं नाही असं ठरवलं असं राजीव खांडेकरांनी सांगितलं. 


ई-टीव्हीत काम केल्यानंतर पुन्हा लोकसत्तामध्ये काम केलं. तिथं वेगवेगळे प्रयोग केले. त्यानंतर लोकसत्ता सोडून त्यावेळचे 'स्टार माझा' या ठिकाणी संपादक म्हणून जबाबदारी घेतली असं आपल्या पत्रकारीतेतील वाटचालीबद्दल सांगताना राजीव खांडेकर म्हणाले. 


तरुण मुलांना घेऊन वाहिनी सुरु केली
वाहिनी सुरु करतानाचा प्रवास उलघडून सांगताना राजीव खांडेकर म्हणाले की, "वाहिनी सुरु करताना तरुण मुलांना घेऊनच सुरु करायचं असं धोरण होतं. त्यामुळे मुंबई-पुण्याच्या पलिकडे जाऊन महाराष्ट्रातील तरुणाची टीम तयार केली. कारण ग्रामीण भागातील तरुणांना एकाच वेळी अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे अनेक गोष्टींचं त्यांना भान असतं. सर्व क्षेत्रातील तोंडओळख असायला हवी ही माध्यमांत काम करणाऱ्या लोकांची गरज असते आणि ग्रामीण भागातील तरुण ती नेमकेपणाने भागवतात."


राजीव खांडेकर पुढे म्हणाले की, "सुरुवातीच्या काळात या वाहिनीचे एकीकडे कौतुक तर दुसरीकडे हेटाळणी झाली, माझाचा लूक हा आंतरराष्ट्रीय होता आणि या टीमला आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी प्रशिक्षित केलं होतं. आपल्या प्रेक्षकांना हे सगळं बघायची सवय नसल्याने सुरुवातीच्या काळात या गोष्टी घडल्या." 


चॅनेलने लूक बदलला आहे, तुम्हाला तुमचा लूक का बदलावासा वाटला असं संजय राऊतांनी विचारता राजीव खांडेकर गंमतीनं म्हणाले की, "प्रत्येकजण आपल्या वकुबानुसार आपला लूक बदलत असतो. बाकी काही नाही बदलू शकलो, त्यामुळे मी मिशांचा लूक बदलला. मिशांचा टोकदारपणा मला वाहिनीमध्ये आला तरी चालेल."


एबीपी माझाच्या टोकदार भूमिकेमुळे कधी कुणाला काही खुपलंय का आणि त्या वेदना तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत का असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. त्यावर बोलताना राजीव खांडेकर म्हणाले की, "15 वर्षांपूर्वी काही कुणाला काही खुपलं तर त्याकडे विधायक दृष्टीने बघितलं जायचं. आज टीका ही जाहीरपणाने करु नका ही भावना राजकारणातील लोकांची आहे. पण जोपर्यंत तुमच्या टोचण्याबद्दल, खुपण्याबद्दल लोकं तुम्हाला शिव्या घालत असतात त्यावेळी तुमचं बरं चाललेलं आहे असं पत्रकारांनी मानायला हवं."


बातमी आणि बातमीदार तटस्थ असावा
वृत्तवाहिनीच्या संपादकाला स्वत: राजकीय मत असावं का असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला. त्यावर राजीव खांडेकर म्हणाले की, "प्रत्येक संपादकाला आपली स्वत: ची भूमिका असलीच पाहिजे. पण ती भूमिका अग्रलेखातून व्यक्त व्हावी, बातमीतून नाही. बातमी ही बातमीच असावी. वाहिनीमध्ये रिपोर्टरला भूमिका असू नये, त्याने तटस्थपणे बातमी द्यावी. वाहिनीची भूमिका ही सत्यासाठी असावी. हे करताना माझी वैयक्तिक भूमिका काही असेल तर ती व्यासपीठावरुन मांडेन. वाहिनीचा विचार हा जनतेचं हित हाच असायला हवा, त्याने लोकांशी आपली बांधिलकी ठेवायला हवी."


ब्रेकिंग न्यूजची स्पर्धा आवश्यक आहे का असा संजर राऊतांनी प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना राजीव खांडेकर म्हणाले की, "काही गोष्टी या अनावश्यक असतात. पण आपल्याकडे सर्वप्रथम बातमी आली आहे असा विचार करुन ब्रेकिंग न्यूज दिल्या जातात. बहुतांशवेळी त्या अनावश्यक असतात. 'माझा'वर ब्रेकिंग न्यूज दाखवताना आपल्या प्रेक्षकांसांठी ती महत्वाची आहे का हे पाहिलं जातं."


कट्टा सुरु करावा असं का वाटलं? 
माझा कट्ट्याने विविध लोकांना बोलतं करुन महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं जीवन समृद्ध केलं. हा कट्टा सुरु करावा असं का वाटलं असं संजय राऊतांनी विचारलं. त्यावर बोलताना राजीव खांडेकर म्हणाले की, "लोक बातम्या वाचून त्या व्यक्तीबद्दल मतं बनवतात. प्रत्यक्षात ती व्यक्ती तशी असेलच असं नाही. माध्यमामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी त्या व्यक्तीला नीट पारखावं, त्याच्याशी संवाद साधायला हवा त्यामुळे या कट्ट्याची सुरुवात केली."


बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे कधी माझा कट्ट्यावर येऊ शकले नाहीत. त्यावर बोलताना राजीव खांडकर म्हणाले की, "बाळासाहेब असताना कट्ट्याचं स्वरुप आजच्या प्रमाणे नव्हतं, ते प्रासंगिक होतं. बाळासाहेब ठाकरे कट्ट्यावर येऊ शकले नाहीत याची खंत आहे. त्यांचं व्यक्तिमत्वच असं होतं की त्यांनी मराठी तरुणांची नस ओळखळी होती. शरद पवार हे कट्ट्यावर येणार होते पण काही कारणाने ते येऊ शकले नाहीत ही उणीव आहे." 


सर्वात आवडता कट्टा कोणता? 
सर्वात आवडलेला कट्टा कोणता असं विचारल्यानंतर राजीव खांडेकर म्हणाले की, "अलिकडेच झालेला रघुवीर खेडकर आणि मंगला बनसोडे यांचा जो कट्टा झाला तो अत्यंत भावनिक होता. त्यामुळे लोककलावंतांची वेदना आपल्याला महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहचवता आली. त्यामुळे महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे याचं त्यांना समाधान मिळालं." 


राजीव खांडेकर म्हणाले की, " माझा ने काही कार्यक्रम केले जे खूप आनंददायी होतं. चीनच्या युद्धावरची डॉक्युमेंटरी, पानिपताच्या युद्धावरील डॉक्युमेंटरी खूप चांगली झाली. शिवाजी महाराजांची आग्र्यावरुन सुटका आणि त्यांचा रायगडापर्यंतचा मार्ग दाखवण्याची खूप इच्छा होती, पण तो प्रवास गुप्त असल्याने आणि त्यावर वेगवेगळी मतांतरे असल्याने तो करु शकलो नाही. पण महाराज आग्र्यापर्यंत कसे पोहोचले आणि मिर्झाराजेंसोबतच्या कराराचे मुळची कागदपत्रे आपण मराठी माणसांना पहिल्यांदाच दाखवल्या. तंजावरच्या मराठे असतील किंवा वारीचे सखोलपणाने पहिलं दर्शन हे माझाने दाखवलं. महाराष्ट्राचे सांस्कृतीक वैभव माझाने दाखवण्याचा प्रयत्न केला हे आनंददायक होते."


आजही काही महत्वाचं घडलं तर लोक माझाला प्राधान्य देतात कारण त्या बातमीमध्ये त्यांना विश्वासार्हता वाटते हेच महत्वाचं आहे असं राजीव खांडेकर म्हणाले. 


बोलीभाषेचा वापर
राजीव खांडेकर म्हणाले की, "प्रत्येक मराठी बोलीभाषेमध्ये काही वेगळी ताकद आहे. पण गेल्या काही वर्षात प्रमाण भाषेचं बडेजाव करत या बोलीभाषांची अवहेलना केली जातेय. ही जी स्थिती आहे ती बदलली पाहिजे. त्यामुळे माझा लॉन्च करताना त्या-त्या रिपोर्टर्सना त्यांच्या बोलीभाषेत बोलायचं स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे बोलीभाषेचा न्यूनगंड कमी होण्यास मदत झाली."


'माझा'च्या नावाचा किस्सा
 वाहिनीला 'माझा' हे नाव कसं देण्यात आलं याचा किस्ता सांगताना राजीव खांडेकर म्हणाले की, "वाहिनीचे नाव काय असावं यावर खूप चर्चा करण्यात आली होती. ते नाव लोकांच्या रोजच्या वापरातील असावं अशी भूमिका होती. त्यावर एक स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक मराठी माणसाच्या बोलण्यात माझा हे नाव असतं. त्यामुळे माझा हे नाव ठेवलं आणि ते लोकांच्या पचनी पडलेलं आहे असं राजीव खांडेकरांनी सांगितलं."


'माझा'चं यश हे टीमवर्क
माझाचं जे यश आहे ते कुणा एका व्यक्तीचं नाही तर ते टीमचं आहे. चौदा वर्षानंतर माझा हा ब्रॅन्ड निर्माण झालाय याचं श्रेय हे टीमचं आहे असं राजीव खांडेकर म्हणाले. प्रत्येकजणाचे काही गुण असतात, त्यांना ज्या-ज्या वेळी संधी मिळाली त्या वेळी त्यांनी त्याचं सोनं केलं असंही राजीव खांडेकर म्हणाले. 


चौदा वर्षाला आपल्या भारतात खूप महत्व आहे, रामायणामध्ये रामाला चौदा वर्षांचा वनवास करावा लागला, आता चौदा वर्षांनंतर आपला काय संकल्प आहे असं संजय राऊतानी विचारल्यानंतर, हा चौदा वर्षाचा वनवास असेल तर आता रामराज्य आणूया असं राजीव खांडेकर गंमतीने म्हणाले. 


बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या मुलाखतीनंतर राजीव खांडेकरांची मुलाखत घेतल्याचं सांगत कट्टा संपताना खासदार संजय राऊत यांनी सर्वांचं आभार मानलं.