मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane Son Nilesh Rane)  यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane Quits Politics)  यांनी राजकरणाला रामराम केला आहे.  निलेश राणे यांनी ट्वीट करत निर्णय जाहीर केल्यामुळे चर्चांना सध्या ऊत आला आहे. निलेश राणे 2009 साली म्हणजे वयाच्या 28 व्या वर्षी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून (Ratnagiri Sindhudurg Constituency)  निवडून आले होते. राज्याच्या राजकरणातील सर्वात तरूण खासदार  अशी त्यांची ओळख होती.


निलेश राणे यांचा जन्म मार्च 1981 साली झाला. निलेश राणे राज्याच्या राजकरणात नेहमीच कोणत्या ना कोणत्य कारणांनी चर्चेत असतात. निलेश राणे भारतीय जनता पार्टी मधील एक राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते 2009 साली  पंधराव्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 


2008 साली  घेतली Doctorate पदवी 


निलेश राणे हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे ह्यांचे पुत्र आहेत. निलेश राणे ह्यांचे भाऊ नितेश नारायण राणे विद्यमान महाराष्ट्र विधानसभा सदस्य आहेत.निलेश राणे यांनी तत्त्वज्ञान विषयात Doctorate पदवी घेतली आहे. त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून झाले आहे. फेब्रुवारी 2008 साली त्यांना पदवी मिळाली आणि लगेच ते राजकरणात सक्रिय झाले. 


तळागाळातील कार्यकर्त्यांचे आवडीचे व्यक्तिमत्त्व


निलेश राणे यांची प्रशासनावरील पकड, जनतेचा बळकट पाठिंबा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचे आवडीचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. जनतेचे प्रश्न चुटकीसरशी सोडविण्यात ते तरबेज असल्याने जनपाठिंबा मोठा आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच स्वतः डॉक्टरेट असल्याने औद्योगिक क्षेत्रातील नामवंतांमध्ये आवडीचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत.


काय म्हणाले निलेश राणे?


"सक्रिय राजकारणातून मी कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या 19-20 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. भारतीय जनता पक्षामध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे". निलेश राणे यांच्या ट्विटने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निलेश राणेंच्या  कोकणातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बिघडणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राणेंना पक्षात घेण्यासाठी मोठी खेळी केल्याचे बोलले जात आहे. कोकण आणि राणे असे समीकरण गेल्या काही वर्षात कोकणात पाहायला मिळत आहे. 


हे ही वाचा :


Nilesh Rane : दाढी न काढण्याचा निर्धार ते राजकारणाला बाय बाय, निलेश राणेंनी राजकारण का सोडलं?