कोल्हापूर : ना कुणाचं नाव.... ना बॅनर.... ना मोठेपणा.... पण तरीही सगळे एकत्र आले आणि त्यांनी मदतीला सुरुवात केली. कोल्हापूरला आलेल्या महापुरातून पुन्हा उभारत कोल्हापूरकरांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा एक नवा 'कोल्हापूर महापूर पॅटर्न' तयार केला आहे. एकाच छताखाली काडीपेटीपासून डाळींपर्यंत... मीठापासून तेलापर्यंत सगळ्या वस्तू एकत्र करुन त्या गरजवंतांच्या हातात पडाव्यात यासाठी एक उत्कृष्ट पॅटर्न तयार केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढल्यामुळे पूर आला. या पुरामध्ये कोल्हापुरातील लाखो नागरिक उद्ध्वस्त झाले. पुराच्या पाण्यामुळे त्यांचे संसार वाहून गेले. जीव वाचावा यासाठी कष्टाने बांधलेली घरं आणि संसार पाण्यात सोडून ते बाहेर पडले. कोल्हापुरातल्या विविध ठिकाणी या पूरग्रस्तांसाठी कॅम्प उभारण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून या पूरग्रस्तांसाठी मदत कार्य सुरु झालं. कोणी जेवण पाठवलं, कोणी धान्य पाठवलं, कोणी साड्या आणि कपडे पाठवले, तर कोणी अंथरुण पाठवलं. एखादी आपत्ती आली की मोठ्या प्रमाणात मदत येते. पण ती नेमकी द्यायची किती आणि कोणाला याचं मात्र नियोजन होत नसतं. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपत्ती आल्यानंतर आलेली मदत ही एकाच ठिकाणी किंवा हव्या त्या ठिकाणी पोहोचत नाही. त्यामुळे आता आलेल्या पुराचा सामना करत कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन एक नवा 'कोल्हापूर महापूर पॅटर्न' सुरु केला. कोल्हापुरातील नागरिक एकत्र आले आणि पूरग्रस्तांसाठी येणारी मदत त्यांनी एकाच ठिकाणी मागवली.

हा कोल्हापूर महापूर पॅटर्न आहे तरी काय?

- पूरग्रस्तांसाठी संपूर्ण राज्यातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. जमेल त्या स्वरुपात लोक पूरग्रस्तांना मदत करु लागले आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील धैर्य प्रसाद हॉलमध्ये कोल्हापूर महापूर पॅटर्न राबवण्यात आला.

- पहिल्या टेबलवर पूरग्रस्तांसाठी प्रामाणिकपणे मदत करणाऱ्या स्वयंसेवकांची नोंदणी होते. त्याला या कामाचं संपूर्ण स्वरुप समजावलं जातं. त्याची इच्छा आणि तयारी असेल तरच त्याला या कार्यात घेतलं जातं.

- दुसऱ्या टेबलवर एखादी वस्तू मदत म्हणून द्यायची असेल तर त्याची नोंद होते आणि दिलेल्या वस्तूची पोच याठिकाणी वस्तू देणाऱ्यास दिली जाते.

- तिसऱ्या टेबलवर भेट आलेल्या वस्तूची पाहणी करुन ती वस्तू त्या-त्या विभागात पाठवण्यासाठी तयार केली जाते.

- चौथ्या टेबलवर पूरग्रस्त आणि गरजवंताला हवी असणारी वस्तू अथवा अन्नधान्य किती स्वरुपात पाहिजे याची नोंद केली जाते आणि त्या पद्धतीने त्या वस्तू गरजवंताला दिल्या जातात.

- पाचव्या टेबलवर वस्तू देण्यासाठी आलेल्या व्यक्तींची पूर्ण माहिती, त्यांचे संपर्क क्रमांक घेऊन भविष्यात ही अशाच पद्धतीने सहकार्य करण्याची विनंती करुन त्यांचे आभार मानले जातात.

- सहाव्या ठिकाणी संपूर्ण राज्यातून वस्तू रुपाने जी मदत आहे, त्या वेगळ्या केल्या जातात. वेगवेगळ्या स्वरुपात पिशव्यांमध्ये त्याची बांधणी केली जाते. काडीपेटीपासून तेलापर्यंत आणि बिस्कीटांपासून अन्नधान्यापर्यंत आलेल्या सर्व वस्तू मोजून त्यांची पाकिटं तयार केली जातात.

- सातव्या टेबलवर जे कॅम्पमध्ये पूरग्रस्त म्हणून राहिले आहेत, त्यांना किती प्रमाणात अन्न लागणार आहे, याची माहिती घेऊन त्या पद्धतीनेच व्यवस्थित चांगल्या प्रतीचं ताजं अन्न तयार करुन वितरित केलं जातं.

- आठव्या टेबलवर ज्या पूरग्रस्तांना 200 ते 300 या पटीत नग अन्नाची मागणी केलेली आहे. त्याची शहानिशा करुनच पुढील प्रक्रिया केली जाते.

- नवव्या टेबलवर पूरग्रस्तांसाठी लागणारी औषध, त्यांच्या तपासणीसाठी काही डॉक्टर सज्ज आहेत.

- यानंतर शेवटी एक भलंमोठं किचन तयार करण्यात आलं आहे. या किचनमध्ये सकाळ-संध्याकाळ पूरग्रस्तांसाठी लागणारा चहा-नाश्ता आणि जेवण बनवलं जातं. हे जेवण कोल्हापुरातल्या विविध हॉटेल्समध्ये काम करणारे कुक बनवतात. त्यामुळे या अन्नाला गुणवत्ता निर्माण झालेली आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी किमान 80 हजार लोकांचे जेवण इथे बनवलं जातं आणि तितक्याच प्रमाणात ते पूरग्रस्तांना पुरवलं जातं.

प्रतिक्रिया

उज्वल नागेशकर - कोल्हापूरवर खूप मोठं संकट आलेलं आहे. जेव्हा देशात एखाद्या राज्यावर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. त्यावेळी कोल्हापूरकर धावून जातात, अशा कोल्हापूरकरांवर ही वेळ आली आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र येऊन या परिस्थितीला बदलण्यासाठी कायमस्वरुपी कोल्हापूर महापूर पॅटर्न तयार केला आहे. जेणेकरुन पूरग्रस्तांना चांगलं धान्य, चांगलं अन्नधान्य मिळेल आणि त्याची नासाडी होणार नाही याची खबरदारी घेतली आहे.

सचिन शानभाग - कोल्हापूर महापूर पॅटर्नमधून पूरग्रस्तांना मदत केली जाते. मात्र या पॅटर्नमागे कोल्हापुरातील हॉटेल चालक-मालक संघटना, सीए संघटना, डॉक्टर संघटना, विद्यार्थी तसंच विविध क्षेत्रात काम करणारे लोक अहोरात्र राबत आहेत.

अतिशय सुटसुटीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने आलेल्या प्रत्येक वस्तूची नोंद करुन ती व्यवस्थित हाताळून ती गरज अंतापर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्रणालीच तयार झाली आहे. यासाठी कोल्हापुरातील 600 जण अखंडपणे राबत आहेत. हा पॅटर्न राज्यात कुठेही महापूर किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या ठिकाणी वापरता येईल, अशी आशा या पॅटर्नमध्ये काम करणाऱ्या कोल्हापूरकरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच एवढं मोठं संकट डोक्यावर आला असतानाही डोकं शांत ठेवत संयम ठेवत कोल्हापूरकरांनी सुरु केलाय 'कोल्हापूर महापूर पॅटर्न'.