कोल्हापूर : शहरातील दुधाळीचा भाग व जिल्ह्यातील 19 गावे, 11 वाडे, गोकुळ शिरगाव, शिरोली व कागल पंचतारांकित एमआयडीसी पाणी योजनेचा वीजपुरवठा आज दिवसभरात सुरु करण्याचे मोठे काम महावितरणने केले आहे. दिवसभरात पाच उपकेंद्रे सुरु करुन तब्बल 43 हजार 369 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु केल्याने बहुतांश पुरग्रस्त भाग पुन्हा एकदा प्रकाशमान झाला आहे.
महापुराचा महावितरण यंत्रणेला मोठा फटका बसला आहे. पूरग्रस्त भागातील वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवावा लागला. कोल्हापुरातील 26 वीज उपकेंद्र पुरामुळे बाधित झाले होते, त्यापैकी आज अखेर 19 उपकेंद्र सुरू झाली आहेत तर 7 उपकेंद्रे बंद आहेत. परंतु त्यावरील बहुतांश भाग पर्यायी मार्गाने सुरू केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. आज सुरू केलेल्या उपकेंद्रात कांचनवाडी, कानूर, कुरुंदवाड, हासणे व दुधाळीचा समावेश आहे.
दुधाळी उपकेंद्रावर आज दुपारपासून भार टाकण्यात आल्याने शहरातील 19 हजार 268 ग्राहकांची वीज सुरु झाली. तसेच ग्रामीण भागातील चार उपकेंद्र सुरु झाल्याने चंदगड उपविभागातील कानूर, कोवाड, बिजूर, चंदगड, पारणे, गेलुगडे, उमगाव, इनाम कोळींदे, आजऱ्यातील किनी, फुलेवाडीतील मरळी, चिंचवडे, आरे, सावरवाडी, कुरुंदवाड मधील कुरंदवाड, हेरवाड, तेरवाड आणि राधानगरी उपविभागातील बानेत व हासणे अशा 19 गावांचा समावेश आहे. तर मनवाड, आढाववाडी, खापणेवाडी, कोलीक, चाफेवाडी, बाजारभोगावपैकी धनगरवाडा, करंजफेण, सावर्डे, पाल, दाभोळकरवाडी व वडाजीवाडी असे 11 वाडे सुरु करण्यात आले. ही गावे व वाडे सुरु झाल्याने ग्रामीण भागातील 24 हजार 101 वीज जोडण्या सुरू झाल्या आहेत.
शिरोली, शिरगाव, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसह, गडहिंग्लज व उजळाईवाडीसह 14 गावांची पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचेही मोठे काम देखील आज महावितरणने केले आहे. उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठाही सुरु करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. नागरिकांनीही संयम बाळगावा असे आवाहन महावितरणने केले आहे.