मुंबई : सह्याद्री देवराईच्या वतीने आज एका नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आज पासून सह्याद्री देवराईचे सदस्य अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरे करणार आहेत. वाढदिवसानिमित्त मातीचा केक कापून ती माती झाडं लावण्यासाठी वापरण्यात येणार आहे. या उपक्रमाची माहिती सह्याद्री देवराईचे प्रमुख सयाजी शिंदे आणि सह्याद्री देवराईची टीमने दिली आहे.
याबाबत अधिक बोलताना अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की, "आजपासून सहयाद्री देवराईच्या वतीने वृक्षांच्या सानिध्यात वृक्षरोपण करून आता सर्व सदस्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येईल. वाढदिवस साजरा करताना जे झाड लावण्यात येईल त्याची जबाबदारी सह्याद्री देवराईचे सदस्य आणि ज्याचा वाढदिवस आहे तो व्यक्ती किंवा त्याचे कुटुंबिय घेतील."
सह्याद्री देवराईच्या वतीनं आता सुगंधी गार्डन ही संकल्पना देखील राबवण्यात येणार आहे. यासाठी औषधी वनस्पती, फळ झाडं आणि फुल-झाडं यांचा वापर करण्यात येणार आहे. हा उपक्रम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पार पडेल. अशाच प्रकारचा वाढदिवस आपल्या महाराष्ट्रातील जनतेने साजरा करावा आणि जास्तीत जास्त वृक्षारोपण करावं असा संदेश देखील यावेळी सयाजी शिंदे यांनी दिला.
सह्याद्री देवराईकडून गेल्या वर्षी 'सावलीत वारी' उपक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. वारीच्या मार्गांवर शेकडो वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली होती. या झाडांना ज्ञानोबा, तुकोबा, मुक्ताई, पंढरीचा विठोबाराया समजून आपल्याला वाढवायचं आहे. भविष्यात याच झाडांच्या रूपात भगवंत आपल्या डोक्यावर छाया धरणार आहेत असं आवाहन करण्यात आलं होतं.
नागरिकांना आपल्या घरासमोर, रानात, बांधावर झाडे लावण्याचं आवाहन सह्याद्रीकडून करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :