उदगीर हे लातूर जिल्ह्यातील तालुक्याचे शहर असून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागात वसलेलं आहे. लातूरपासून 70 किलोमीटर अंतरावरील उदगीर मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मागील अनेक वर्षांपासून उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी जोर धरत आहे. या भागातील लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटना यांनी सातत्याने उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी लावून धरली होती. नऊ आणि 10 जानेवारीला औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विभागीय आयुक्तांची बैठक पार पडली. या बैठकीत उदगीर जिल्हा निर्मिती संबंधी चर्चा झाली होती. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी लातूरचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात उदगीर जिल्हा निर्मिती संदर्भातील माहिती तात्काळ देण्यासंदर्भात सांगण्यात आला आहे. तसेच प्रशासकीय इमारतीसाठीचं काम गतिमान करण्याच्या सूचनाही आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर उदगीर जिल्हा निर्मितीच्या हालचाली वेग धरत असल्याचे दिसून येते. उदगीर, जळकोट, अहमदपूर, लातूर जिल्ह्यातील हे तीन तालुके तसेच नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार या तालुक्यांचा समावेश करत उदगीर जिल्हा निर्मिती करण्याची मागणी अनेक दिवसापासूनची आहे. या बातमीनंतर उदगीर, जळकोट आणि अहमदपूर येथील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. उदगीर ते अहमदपूर अंतर 32 किलोमीटर आहे. उदगीर ते जळकोट अंतर हे 25 ते 30 किलोमीटरच्या आत आहे. लोहा कंधार हे दोन तालुकेही उदगीरच्या जवळ आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर या भागातील नागरिकांना प्रशासकीय कामासाठी उदगीर हे सोयीस्कर ठिकाण होऊ शकते. यामुळे या भागातील नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. मागील अनेक वर्षांपासूनची ही मागणी कायम थंडबस्त्यात जात होती. याची कारण म्हणजे उदगीर शहर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या सीमा भागाला लागून असलेला भाग आहे. उदगीर जिल्हा निर्मिती करताना नेमके कोणते तालुके त्याला जोडले जावे याबाबत सरकारी पातळीवर काही ठरत नव्हते. त्यामुळे उदगीर जिल्हा निर्मितीचा विषय कायमच मागे पडत होता.
या जिल्ह्यातूनही होतेय मागणी -
लातूरनंतर अनेक जिल्ह्यातून आता नवीन जिल्ह्याची मागणी होत आहे.
बीडमधून अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी होतेय.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याला जिल्हा करण्याची मागणी.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावची मागणी आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर किंवा ब्रह्मपुरी जिल्हा तयार करावा, अशी मागणी आहे.
पुणे जिल्ह्यातूनही इंदापूर किंवा बारामती, असा वाद सुरू आहे.
सोलापूर जिल्ह्यात बार्शी जिल्ह्याची मागणी होत आहे.
ठाणे जिल्ह्याचे तर चार जिल्ह्यात विभाजनाची मागणी आहे.
अहमदनगरमध्येही शिर्डी आणि श्रीरामपूर जिल्ह्याची जुनी मागणी आहे.
Latur District | लातूर जिल्ह्याचं लवकरच विभाजन होणार? | ABP Majha