मुंबई : देशाच्या जनगणनेसाठी मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येणार असून त्यासाठी त्यांच्या मे महिन्यातील सुट्ट्या शिक्षकांच्या रद्द करणार आहेत. पिंपरी चिंचवड इथल्या जनगणना अधिकारी यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना तसे पत्र देऊन आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या निर्णयाचा निषेध केला आहे. याबाबत हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी जनगणना अधिकारी यांच्याकडे करणार आहेत


2021 च्या जनगणना आता सुरु होणार असून यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये घरांना क्रमांक देणे, गटाची विभागणी करणे, घरयादी तयार करणे ही कामे 1 मे ते 15 जून 2020 या कालावधीत केली जाणार आहेत. त्यासाठी शिक्षकांच्या रजा रद्द करुन हे काम करावे लागणार आहे. त्यामुळे वर्षाच्या 76 पैकी 39 सुट्ट्यांवर गदा येणार आहे. हे काम इतर कर्मचाऱ्यांना द्याव्यात आणि शिक्षकांचा भार कमी करुन त्यांना हक्काच्या सुट्ट्या द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषेदेने केली आहे.

दोन वर्षांपासून शाळेच्या वर्गाची पायरीही चढली नाही, शिक्षकांना तब्बल 37 कामं!

या कालावधीत महापालिका आणि खासगी शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना मुख्यालय सोडू देऊ नये अशा सूचना जनगणना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मुख्यालय सोडण्यास परवानगी दिल्यास त्यासाठी मुख्याध्यापकांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.

या काळात शिक्षकांना पेपर तपासणीचे काम असणार शिवाय दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी पेपर तपासणी करणे आवश्यक असते. मात्र या काळात जनगणनेच्या कामात शिक्षक व्यस्त राहिला तर शिक्षकांना या कामाचा ताण येऊ शकतो, अशी प्रतिक्रिया शिक्षक संघटनेकडून मांडण्यात आली आहे.