सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि दिवंगत आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतरचा अनुभव रोहित पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. "दिल्लीमध्ये महाराष्ट्र असणं गरजेचं आहे" ह्या वाक्याची प्रचिती आली आणि रोहित तू बिंदास्त जा तू सांगितलेलं काम झालं असं समज" हे वाक्य धीराचे होते, असं रोहित पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.


केवळ भाजपच नाही तर विरोधी पक्षातील नेतेही नितीन गडकरी यांच्या कामाच्या शैलीचे फॅन आहेत. रोहित पाटील यांनाही गडकरींच्या कामाचा असाच अनुभव आला आणि ते भारावून गेले. त्यामुळेच त्यांनी नितीन गडकरी यांचं कौतुक करणारी आणि आभार मानणारी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.


त्याचबरोबर कवठेमहांकाळ नगरपंचायतीबाबत माहिती घेऊन तिथे मिळालेल्या यशाबद्दल नितीन गडकरी यांनी आपले अभिनंदन केल्याचेही रोहित पाटील यांनी म्हटलं आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी (नागज- सांगोला महामार्ग) इथे ब्रीज अंडरपास उपलब्ध करुन दिला जावा आणि संबंधित रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ग्राह्य केला जावा, अशी विनंती रोहित पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिल्लीत भेट घेऊन केली. यावेळी गडकरी यांनी या कामांसाठी त्यांनी सकारात्मक दृष्टीने निर्देश देत लवकरच हे दोन्ही काम होतील अशी हमी दिली.


या भेटीनंतरचा अनुभव शेअर करताना रोहित पाटील म्हणतात की, "दिल्ली मध्ये महाराष्ट्र असणं गरजेचं आहे" ह्या वाक्याची प्रचिती आज आली."आणि रोहित तू बिंदास्त जा तू सांगितलेलं काम झालं असं समज" हे वाक्य धीराचे होते. आज दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेऊन मतदारसंघातील महत्त्वाच्या विषयांबाबत चर्चा केली. तासगाव बाह्यवळण रस्ता हा प्रस्तावित असून काही काम अपूर्ण राहिले आहे. स्व. आबा असताना ह्या रस्त्याचं काम पूर्ण करण्याचा मानस त्यांचा होता. ह्या रस्त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांना व नवीन तरुणांना नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी संधी उपलब्ध या रस्त्यामुळे होऊ शकते आणि शहरातील दळणवळण साठी अत्यंत फायदेशीर होऊ शकतो हे पटवून दिले. त्यामुळे सदर रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ग्राह्य केला जावा अशी विनंती त्यांना केली. नक्कीच हा बाह्यवळण रस्ता तासगावच्या विकासासाठी नवी नांदी असेल हा विश्वास मला आहे. त्याचबरोबर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी (नगज- सांगोला महामार्ग) येथे ब्रीज अंडरपास उपलब्ध करून दिला जावा अशी विनंती केली. सदर दोन्ही कामांसाठी त्यांनी सकारात्मक दृष्टीने निर्देश दिले असून लवकरच हे दोन्ही काम होतील अशी हमी दिली. त्याचबरोबर साहेबांनी कवठेमहांकाळ नगरपंचायती बाबत माहिती घेऊन अभिनंदन केले."