मुंबई : ठाकरे सरकारचा बहुप्रतिक्षित पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडत आहेत. जवळपास 36 मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होणार असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीचे 13 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यापैकी अनेकांशी पक्षाने संपर्क साधला आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराआधी राष्ट्रवादीत नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे आहे. राष्ट्रवादीचे वाईचे आमदार मकरंद पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश होत नाही हे पाहून त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


मंकरंद पाटील यांना मंत्रिपदातून डावलल्यामुळे वाई, खंडाळा, महाबळेश्वरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. लोणंद ,वाई, महाबळेश्वर नगरपालिकेच्या नगरसेवकांसह तब्बल आठ जिल्हा परिषद सदस्य आपल्या पदांचा राजीनामा देणार आहेत. राष्ट्रवादीचे याठिकाणचे अनेक पदाधिकारी आज यामुळे राजीनामा देणार आहेत. सुरुर येथील किसनवीरांच्या पुतळ्यासमोर सर्व जण आत्मक्लेश आंदोलनही करणार आहेत.


लोणंद नगरपंचायतचे नगरसेवक आणि गटनेते योगेश क्षीरसागर, भुईंज जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, राष्ट्रवादीचे खंडाळा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणेश धायगुडे पाटील, खंडाळा तालुक्याचे राष्ट्रवादीचे सोशल मीडिया अध्यक्ष मोहसीन लतीफ पठाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. खासदारकी कराडला, मंत्रिपदही कराडला, आता सातारा जिल्ह्याचे नाव ही बदलून टाका, अशा शब्दात कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत.


वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तीनही तालुक्यातील पदावर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आबांपेक्षा (मकरंद पाटील) पद मोठं असेल, तर या तीनही तालुक्याची जनता तुम्हाला माफ करणार नाही. परंतु या तिन्ही तालुक्याचे सर्व पदावर असणारे पदाधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देतील आणि हे सिद्ध करतील आपल्या प्रत्येकाच्या हृदयात प्रथम आबा आहेत आणि नंतर पक्ष आहे, अशी साद कार्यकर्तांना घालून दबावाचं राजकारण याठिकाणी सुरु झालं आहे.


'ठाकरे' सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार, 'हे' नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता?


राष्ट्रवादीचे हे नेते शपथ घेऊ शकतात

अजित पवार
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
अनिल देशमुख
डॉ. राजेंद्र शिंगणे
हसन मुश्रीफ 
जितेंद्र आव्हाड 
नवाब मलिक
बाळासाहेब पाटील 
राजेश टोपे
दत्ता भरणे
अदिती तटकरे
संजय बनसोडे