NCP Supremo Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज भीमा कोरेगाव प्रकरणी आपला साक्ष नोंदवणार आहेत. भीमा कोरेगाव (Bhima Koregan) इथं घडलेल्या हिंसचाराची चौकशी करणाऱ्या जे. एन. पटेल आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार पवार साक्ष देणार आहेत. आयोगाकडून 5 आणि 6 मे रोजी मुंबईत होणाऱ्या सुनावणीत हजर राहण्यासाठी पवारांना देण्यात आलेलं हे तिसरे समन्स आहे. सकाळी साडेदहा वाजता शरद पवार आयोगासमेर साक्ष देणार असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणी शरद पवारांनी आपलं अतिरिक्त प्रतिज्ञापत्रही नुकतंच आयोगापुढे सादर केलं होतं. तसेच, यापूर्वी 23 आणि 24 फेब्रुवारीला शरद पवार आपली साक्ष नोंदवण्यासाठी आयोगापुढे हजर राहणार होते. पण काही कारणास्तव ते हजर राहू शकले नाहीत. दरम्यान, आज भीमा कोरेगाव प्रकरणी ते आपली साक्ष नोंदवणार आहेत.
पुण्यातील (Pune) कोरेगाव-भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर राज्यभरात दंगल उसळली होती. पुणे जिल्ह्यात घडलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयकडे (NIA) सोपवला असला तरी राज्य सरकरातर्फे चौकशी आयोगाचं कामकाज निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीपुढे सुरूच आहे.
भीमा कोरेगाव प्रकरणी उसळलेल्या हिंसाचाराला मिलिंद एकबोटे (Milind Ekbote) आणि संभाजी भिडे (Sambhaji Bhide) जबाबदार असून त्यांनी तिथलं वातावरण बिघडवलं होतं, तसेच या प्रकरणी वस्तुस्थिती आणि पुणे पोलिसांचा (Pune Police) तपास यात कमालीचा विरोधाभास आहे, असं पवारांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं होत. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांची साक्षही चौकशी आयोगाने नोंदवली पाहिजे, अशी त्यांची मागणी करणारा अर्ज विवेक विचार मंचचे सदस्य सागर शिंदे यांनी आयोगाकडे केला होता. या घटनेनंतर पवारांनी माध्यमांत केलेल्या काही वक्तव्यांवरून या घटनेसंदर्भात पवारांकडे यासंदर्भातील काही अधिकची माहिती उपलब्ध असण्याची शक्यता असल्याचं सागर शिंदे यांनी आपल्या अर्जात नमूद केलं होतं. त्याची दखल घेत आयोगानं शरद पवार यांना 23 आणि 24 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स पाठवलं होतं. यापूर्वी मुंबईत होणाऱ्या सुनावणी सत्रादरम्यान 4 एप्रिल 2021 ला शरद पवारांना आयोगापुढे साक्ष देण्यासाठी हजर राहण्याचं समन्स जारी करण्यात आलं होतं. मात्र काही कारणास्तव तेव्हाही पवार या सुनावणीला हजर राहू शकले नव्हते.
काय आहे प्रकरण?
1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला या हिंसाचाराच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक चौकशी आयोग नेमला होता. दरम्यान, भिमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार यांनी हा हिंसाचार शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे अॅड. प्रदीप गावडे यांनी या प्रकरणी पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यामुळे आयोगाने शरद पवार यांना साक्ष नोंदवण्यासाठी समन्स आहे.
भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडेंचा सहभाग आढळला नाही, पोलिसांची न्यायालयात माहिती
भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या विरोधात 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासामाध्ये संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सहभाग आढळला नसल्याच पोलीसांनी न्यायालयात सांगितलंय. त्याचबरोबर राज्य मानवी हक्क आयोगालाही त्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात ज्या इतर 41 आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 1 जानेवारी 2018 ला भिमा कोरेगाव या ठिकाणी झालेल्या हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडेंचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केल्यानंतर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारनं संभाजी भिडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.