मुंबई : सांगली, सातारा, कोल्हापूरसह महाराष्ट्रातील काही जिल्हे महापुराच्या संकटात आहेत. या पूरपरिस्थितीत त्याठिकाणी मदत करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या राजकीय यात्रा रद्द केल्या आहेत. राजकीय पक्षांनी आपले दौरे आणि यात्रा रद्द करण्याची आग्रही मागणी 'एबीपी माझा'नं देखील लावून धरली होती.


राज्यातील पूरस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली 'महाजनादेश' यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पूरग्रस्त भागाचा दौराही केला. भाजपनंतर आदित्य ठाकरे यांची 'जनआशीर्वाद' यात्राही रद्द करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आज याची माहिती दिली.


राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपली 'शिवस्वराज्य' यात्रा तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतकार्यावर लक्ष केंद्रित करावे. पूरस्थिती नियंत्रणात आल्यावर यात्रेबाबत नवीन कार्यक्रम जाहीर होईल, असंही शरद पवारांनी सांगितलं.





कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील पूरपरिस्थिती भीषण आहे. अजूनही हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. हजारो घरं पाण्याखाली गेली आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं मोठं आव्हान प्रशासनसमोर आहे.


सांगलीत काही ठिकाणी 2005 च्या महापुरापेक्षाही गंभीर परिस्थिती आहे. सांगली शहरासोबतच जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुरानं थैमान घातलं आहे. कृष्णा नदीच्या काठावरच असलेल्या सांगलीवाडीला पुराच्या पाण्यानं वेढा घातला आहे. घरात वीज नाही, भाजीपाला किंवा दूध नाही. अशा स्थितीत जीव मुठीत घेऊन लोक जगत आहेत. तीन दिवसांपासून ही स्थिती आहे.


कोल्हापूर शहरालाही महापुरानं वेढा घातला आहे. त्यामुळे कोल्हापुरातून बाहेरही निघता येत नाही. वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोल्हापूर शहरातील अनेक भागांमध्ये घरं, दुकानांमध्ये पाणीच पाणी झालं आहे.


पूरग्रस्त भागात एनडीआरएफ नेव्ही, एअरफोर्सची पथकं दाखल झाली आहे. गोवा, गुजरात इत्यादी ठिकाणाहूनही बचाव पथकांना पाचरण करण्यात आलं आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाणी पातळी कमी झाल्याशिवाय जनजीवन सुरळीत होणार नाही.



संबंधित बातम्या