परभणी : परभणी जिल्हयात झालेल्या 566 ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने चांगलेच यश मिळवले असून अनेक तालुक्यातील महत्वाच्या ग्रामपंचायत ताब्यात घेण्यात दोन्ही पक्षांना यश मिळाले आहे. तर मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि प्रहार संघटनेलाही प्रत्येकी एका ग्रामपंचायतीत यश मिळवता आले. जिंतुर वगळता भाजपला इतर तालुक्यात फारसे यश आले नाही तर काँग्रेस चार नंबरवर गेल्याचे चित्र आहे.


परभणी जिल्ह्यातील एकूण 566 ग्राम पंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. ज्यातील 66 ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे 498 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले. तब्बल 83% एवढे विक्रमी मतदान हे जिल्ह्यात झाले त्यानुसार आज मतमोजणी पार पडली. सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत जिल्हाभरातील सर्व ठिकाणचे निकाल हे निवडणूक यंत्रणेने जाहीर केले. ज्यानुसार जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे. तर जिंतुर तालुका वगळता भाजपला जिल्ह्यात इतर कुठेही फारसे यश मिळवता आले नाही.


परभणी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या झरी गावात शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य गजानन देशमुख यांच्या पॅनलने 17 पैकी 10 जागांवर विजय मिळवला. तसेच जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या जांब ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचे संग्राम जामकर यांनी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब जामकर यांच्या पॅनलचा 13 पैकी 11 जागांवर विजय मिळवून सत्ता काबीज केली. शिवाय मांडाखाली येथे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष किरण सोनटक्के यांनी 11 पैकी 9 जागांवर विजय मिळवत सत्ता परिवर्तन घडवून आणले. सुरपिंपरी ग्रामपंचायतीत कॉ. विलास बाबर यांच्या गटाने प्रस्थापितांना धक्का देत 9 पैकी 9 जागा जिंकल्या आहेत .जिंतुर तालुक्यातील सर्वात मोठी आणि महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या बोरीत राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या पॅनलने विद्यमान भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्या पॅनलचा 17 पैकी 14 जागांनी विजय मिळवला तर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत भाजपने यश मिळवले आहे.


पाथरी तालुक्यातील उमरा ग्रामपंचायतीमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे गावात तीन पॅनल उभे होते. मात्र यात कुणालाही बहुमत मिळवता आले नाही. एकूण 9 जागांपैकी राष्ट्रवादी 4, शिवसेना 3 आणि काँग्रेसचा 2 जागांवर विजय मिळाला त्यामुळे इथे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच तालुक्यातील प्रतिष्ठेची बाभळगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी आणि शिवसेना गटाने 11 पैकी 10 जागा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले. तर काँग्रेसचे सर्जेराव गिराम यांच्या गटाचा दारुण पराभव येथे स्वीकारावा लागला. तसेच हदगाव बु. मध्ये पाथरी बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांच्या पॅनल ने 11 पैकी 8 जागांवर विजय मिळवला आहे.


तसेच शहरालगतच्या देवनांद्रा ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीने 13 पैकी 11 जागा मिळवून विजय प्रस्थापित केलाय. मानवत तालुक्यातील रामेटाकळी ग्रामपंचायत माजी जीप सदस्य गंगाधर कदम यांच्या पॅनलचा विजय झाला असून त्यांनी 9 पैकी 9 जागांवर मिळवल्या आहेत. रामपुरीत पंचायत समिती सदस्य शैलेश यादव यांच्या पॅनलला 4 जागा तर माऊली यादव यांच्या पॅनलने 11 पैकी 7 जागा जिंकून विजय मिळवला तर उक्कलगाव ग्रामपंचायतमध्ये विद्यमान सरपंच नाथा पिंपळे यांच्या पॅनलने 9 पैकी 9 जागा जिंकल्या आहेत. पंचायत समिती सभापती प्रमिला उक्कलकर यांच्या पॅनलचा येथे पराभव झालाय. तसेच कोल्हा ग्रामपंचायत माजी पंचायत समिती सभापती नारायण भिसे यांच्या पॅनलने 11 पैकी 9 जागा जिंकत विजय मिळवला आहे. पालम तालुक्यातील आरखेड ग्रामपंचायतीत शेकाप-राष्ट्रवादी आघडीच्या पॅनलचा विजय झाला या पॅनलने 9 पैकी 9 जागा इथं जिंकल्या आहेत.


मनसे, वंचित आणि प्रहारला प्रत्येकी एका ग्रामपंचायतीत यश


महत्वाचे म्हणजे प्रस्थापित पक्षांबरोबरच मनसेने ही पुर्णा तालुक्यातील आलेगाव ग्राम पंचायत निवडणुकीत यश प्राप्त केले आहे. जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख यांच्या पॅनलने 9 पैकी 7 जागा जिंकुन वर्चस्व मिळवले आहे. तसेच राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेनेही पाथरी तालुक्यातील आनंदनगर तांडा ही ग्राम पंचायत 7 पैकी 5 जागा जिंकुन ताब्यात घेतली आहे. शिवाय पाथरी तालुक्यातील बंदरवाडा ग्राम पंचायत ही वंचित बहुजन आघाडीच्या पॅनलने जिंकली आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष कदम यांच्या धारासूरमध्ये त्यांनी पाठींबा दिलेल्या धारासूर विकास आघाडीला 11 पैकी जागाच मिळवता आल्या इथे गुप्तेश्वर विकास आघाडीने 7 जागा जिंकून विजय मिळवला आहे.


संबंधित बातम्या :



AAP Wins in Panchayat Elections: मराठवाड्यात आपची एन्ट्री, केजरीवालांकडून मराठमोळ्या अंदाजात अभिनंदन


व्वा रे पठ्ठे! 21व्या वर्षी मारलं ग्रामपंचायतीचं मैदान, सोलापुरातला ऋतुराज सर्वात तरुण सदस्य






 

ग्रामपंचायत निवडणूक निकाल | लातूरच्या बाभळगावात अमित देशमुखांची बाजी, 15 पैकी 14 जागांवर विजय