नांदेड :काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नांदेडची ओळख आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच वर्चस्व जिल्ह्यावर आहे. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ही आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 907 ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी होत आहे. बहुतांश निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व अनेक ग्रामपंचायतीवर सिद्ध झाले आहे तर भाजपची फारशी सरशी या निवडणुकीत झाल्याचे दिसून येत नाही.


लोहा कंधार मतदार संघाचे शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्रातील एकमेव आमदार श्यामसुंदर शिंदे यांना त्यांचे दाजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गटाकडून दारुण पराभव स्वीकारावा लागलाय. लोहा कंधार मतदार संघातील 159 ग्रामपंचायतीपैकी खासदार चिखलीकर यांच्या चिखली ग्रामपंचायतसह 33 ग्रामपंचायतीवर भाजपने सत्ता संपादन केली आहे. परंतु जिल्ह्यातील इतर 14 तालुक्यात भारतीय जनता पार्टी आपली जादू दाखवू शकली नाही. त्यामुळे भाजपला तोंडघशी पडून महाविकास आघाडीने मोठया प्रमाणात ग्रामीण भागात मुसंडी मारली आहे.


काँग्रेसचा मतदारसंघ असणाऱ्या हदगाव हिमायतनगर मतदार संघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत निवघा बाजार, कोहळी,तळणी, भाटेगाव येथे अपक्ष उमेदवार बाबुराव कदम यांनी कोणत्याही पक्षाची मदत न घेता एकहाती सत्ता काबीज केली आहे. तर नांदेड जिल्ह्याला उत्सुकता लागलेल्या दाभड ग्रामपंचायत निवडणुकीत सासू-सुनेच्या लढतीमध्ये सासूचा विजय झाला आहे. तर नायगाव उमरी मतदार संघाचे भाजपा व आर. पी.आय पक्षाचे आमदार राजेश पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचप्रमाणे नवीन नवख्या वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यात चार ग्रामपंचायतवर आपली एक हाती सत्ता प्रस्थापित केली आहे.


गेले 30 ते 35 वर्षे काँग्रेसचे अधिपत्य असणाऱ्या बारड,मालेगाव, पावडेवाडी, विष्णुपुरी, सोनखेड ग्रामपंचायतीवर पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता आल्यामुळे भाजपची मोठी पीछेहाट झाल्याचे पाहायला मिळत आहे.


संबंधित बातम्या :