Anil Deshmukh on Govt : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकारवर चांगलीच टीका केलीय. 
कर्जमाफीचे आश्वासन हा फक्त चुनावी जुमला होता असे देशमुख म्हणाले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन निवडणुकीत महायुतीने दिले होते. सरकार आल्यानंतर मात्र सत्ताधाऱ्यांना या आश्वासनाचा विसर पडलेला दिसतोय. आज अजितदादा पवार यांनी मी माझ्या भाषणात कधीच कर्जमाफीचा उल्लेख केला नाही असे वक्तव्य केल्याचे देशमुख म्हणाले. 


सरकार म्हणून अजितदादा पवार यांची सुद्धा जबाबदारी 


महायुतीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करु असा जाहीरनाम्यात भाजपाने स्पष्टपणे उल्लेख केला होता असे अनिल देशमुख म्हणाले. आता सरकार म्हणून अजितदादा पवार यांची सुद्धा जबाबदारी आहे की, शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे. दुष्काळ, अतिवृष्टी, पिकांना भाव नसल्यामुळं शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्या बळीराजाला कर्जमुक्त करुन आधार देण्याची नितांत आवश्यकता आहे. नुकतेच मी कर्जमाफीच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.


नेमकं काय म्हणाले अजित पवार?


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथे एका जाहीर कार्यक्रमात आपण आपल्या भाषणात कधीच कर्जमाफीबद्दल बोललो नसल्याचे म्हटले आहे. “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?” असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना राज्य सरकारवर टीका केली आहे. अजित पवार यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या विधानामुळे कर्जमाफीच्या बाबतीत संभ्रमअवस्था तर तयार झालीच आहे शिवाय शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात नाराजी वाढू लागली आहे.


विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी विविध आश्वासाने दिली होती. यामध्ये भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेलं महत्वाचं आश्वासन म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी हे होतं. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळं या मुद्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक धाल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन सरकारवर टीका केली आहे. हा फक्त चुनावी जुमला होता असं ते म्हणालेत. आता त्यांच्या या टीकेला भाजप काय प्रतिउत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा, कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयावरुन 5 लाख रुपये होणार?