Nagpur News नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP Ajit Pawar Camp)  गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar) यांनी आज शरद पवार (Sharad Pawar) यांची घरी जाऊन भेट घेतली. छगन भुजबळ हे आज सकाळी अचानक शरद पवारांच्या भेटीला गेल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.  छगन भुजबळांनी शरद पवारांशी तब्बल दीड तास चर्चा केली.


छगन भुजबळांनी शरद पवारांशी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केल्याची माहिती स्वत: मंत्री छगन भुजबळांनी भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन दिली. मात्र प्रत्यक्षात नेमकी काय चर्चा झाली हे एक कोडंच असल्याचे बोलले जात आहे. अशातच काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी एक सूचक वक्तव्य केल्याने अनेक चर्चेला उधाण आले आहे. 


शरद पवारांबद्दल केलेल्या व्यक्तव्याचा त्यांना पश्चाताप- नितीन राऊत 


छगन भुजबळ महविकास आघाडीत आले तर महविकस आघाडी त्यांचे स्वागतच करेल. आजही भुजबळांची शरद पवारांशी बंधू भावाची बांधिलकी घट्ट आहे. असे मोठं विधान काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. ते नागपूर येथे बोलत होते. छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट अचानक झालेली नाही. तर त्यामागे दोन कारण असल्याचेही नितीन राऊत म्हणाले. पहिले कारण म्हणजे काल बारामतीत भुजबळांनी शरद पवारांबद्दल जे काही वेडे वाकडे बोलले हे एक होते. तर ज्या शरद पवारांनी आपल्याला राजकारणात संधी दिली, त्या शरद पवारांबद्दल आपण असं बोललो याची खंत भुजबळांना वाटली असावी आणि त्याच पश्चातापातून भुजबळ शरद पवारांना भेटले असावे असे राऊत म्हणाले.  सोबतच आजही भुजबळांची शरद पवारांशी बंधू भावाची बांधिलकी घट्ट असल्याचा दावा ही नितीन राऊत यांनी केला.  


भुजबळ महाविकास आघाडीत आले तर मविआ त्यांचे स्वागतच करेल 


भुजबळांची अचानक शरद पवारांशी झालेल्या भेतीमागील दुसरं कारण म्हणजे, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आजची भेट असावी, असे ही नितीन राऊत म्हणाले. दरम्यान, येणाऱ्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून आजची भेट महत्त्वाची आहे. या भेटीतून काही नवीन राजकीय दिशा निघते का आणि भुजबळ भविष्यात कोणत्या मार्गाने जातील, याबद्दल भुजबळच सांगू शकतील. मात्र, गेले दोन अधिवेशन भुजबळ अस्वस्थ दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी तणाव असल्याचे सांगत नितीन राऊत यांनी भुजबळ महाविकास आघाडीत आले तर महाविकास आघाडी त्यांचा मन:पूर्वक स्वागतच करेल असं सूचक वक्तव्य ही त्यांनी केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या