Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आता वेगळी भूमिका घेण्याची वेळ आली आहे. या विषयात राज्य सरकारने भूमिका घेणं गरजेचं होतं. मात्र ती भूमिका घेतली जात नाही. आज हल्ले झाले त्यामुळे सीमाभागात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. येत्या 24 तासात वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल. त्यानंतर जे होईल त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलाय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जतमधील गावांवर हक्क सांगितल्यापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. याच पार्श्वभूमीवरशरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड संघटनांकडून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेताल. पुण्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक बसेसना काळा आणि भगवा रंग लावला. तर विविध संघटना ट्रकवरील हल्ल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आता वेगळी भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचा इशारा दिलाय.
"कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अलीकडे जी वक्तव्य केली आहेत त्याने सीमावादाला वेगळं वळण लागत आहे. त्यांच्या सततच्या वक्तव्यांमुळे सीमा भागातील परिस्थिती गंभीर बनली आहे. आज बेळगावात महाराष्ट्रातील काही ट्रकवर दगडफेक केली ही गोष्ट अतिशय निषेदार्ह आहे. या घटनेचा निषेध केला पाहिजे. सीमावाद प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा मुद्दाम प्रयत्न केला जात आहे. सीमा भागातील मराठी भाषेच्या लोकांना सतत त्रास दिला जात आहे. सध्या जो वाद सुरू आहे त्याला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य जबाबदार आहेत. हा वाद थांबवायचा असेल तर त्यासाठी आता दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी समन्वयातून मार्ग काढला पाहिजे. शिवाय केंद्राने या प्रश्नावर बघ्याची भूमिका घेऊन नये, असा हल्लाबोल शरद पवार यांनी यावेळी केलाय.
"देशाच्या ऐक्याला धक्का देण्याचं काम केलं जात आहे. उद्या पासून संसदीय अधिवेशन सुरू होत आहे. मी खासदारांना विनंती करणार आहे की त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घ्यावी आणि सध्याच्या परिस्थितीची माहिती द्यावी. तरी देखील भूमिका घेतली गेली नाही तर आम्हाला भूमिका घ्यावी लागणार आहे. महराष्ट्राने नेहमीच संयमाची भूमिका घेतली आहे. परंतु, संयमाला देखील मर्यादा असतात. परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर बेळगावला जाणार, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या