Pune Pmpml : ग्रामीण (Pune) भागातील पीएमटी (PMPML) बससेवा सुरु करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यांची मागणी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्य केली आहे. त्यांनी पीएमपीएमएल प्रशासनाला बससेवा बंद केलेल्या मार्गावर बससेवा पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
एसटी महामंडळाच्या पत्रानंतर ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची बससेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला होता. मात्र ही बससेवा पूर्ववत करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना दिल्या असून त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना काळानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना पीएमपीएमएल प्रशासनाने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अनेक मार्गांवर आपली बससेवा सुरु केली होती. मात्र जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर एसटी महामंडळाची देखील बससेवा पुन्हा सुरु झाली. त्यामुळे महामंडळाने पत्र लिहून संबंधित मार्गांवरील बससेवा बंद करावी आणि आपला उत्पन्नाचा स्त्रोत पुन्हा देण्याची विनंती पीएमपीएमएल प्रशासनाकडे केली होती.
त्यानंतर पत्राच्या अनुषंगाने पीएमपीएमएल प्रशासनाने नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी 11 मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अजून 12 मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाच्या या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत होती. मात्र ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा सुरु ठेवण्याची मागणी नागरिकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून सातत्याने होत होती. नागरिकांंच्या या मागणीची पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी दखल घेतली आणि पीएमपीएमएलचे संचालक ओमप्रकाश बोकोरिया यांना भागातील बससेवा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
'या' 11 मार्गावर बससेवा होणार पूर्ववत
ग्रामीण भागातील 11 मार्गावरील पीएमपीएलची बससेवा पूर्ववत करण्यात आली आहे. दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होत होता. हे मार्ग पुन्हा सुरु करण्याची मागणी सातत्याने सुरु होती. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी बससेवा पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहेत. या मार्गावर बससेवा पूर्ववत होणार आहे.
1) स्वारगेट ते काशिंगगाव
2) स्वारगेट ते बेलावडे
3) कापूरहोळ ते सासवड
4) कात्रज ते विंझर
5) सासवड ते उरुळी कांचन
6) हडपसर ते मोरगाव
7) हडपसर ते जेजुरी
8) मार्केटयार्ड ते खारावडे
9) वाघोली ते राहूगाव, पारगावट
10) चाकण ते शिक्रापूर फाटा
11) सासवड ते यवत
या मार्गांवरील बससेवा पूर्ववत करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवाशाची सोय होणार आहे.