मुंबई: नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर आता त्यांना 3 मार्चपर्यंत म्हणजे नऊ दिवसांची ईडीची कस्टडी देण्याचा निर्णय सत्र न्यायालयाने दिला आहे. मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. त्यानंतर या प्रकरणात सत्र न्यायालयात हा निर्णय दिला आहे.


हे प्रकरण अंडरवर्ल्डशी संबंधित आहे, मनी लॉंड्रिंगशी संबंधित आहे त्यामुळे या प्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी ईडीची कस्टडी मिळावी अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती.


ईडीच्या कस्टडीच्या काळात नवाब मलिक यांना औषधे आणि त्यांच्या घरातून जेवण मिळावे अशी मागणी नवाब मलिकांच्या वकिलांनी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे. 


काय म्हणाले नवाब मलिक?
आपल्याला जबरदस्तीने अटक करण्यात आली आहे, या प्रकरणी कोणताही समन्स न देता आपल्याला या ठिकाणी आणण्यात आलं आणि सही घेण्यात आली असा आरोप नवाब मलिकांच्या वतीने सत्र न्यायालयात करण्यात आला आहे. आपल्यावर कोणत्या अधिकारांखाली कारवाई करण्यात आली आहे याचीही माहिती देण्यात आली नसल्याचं त्यांच्यावतीनं कोर्टाला सांगण्यात आलं आहे.


ईडीचा युक्तीवाद
दाऊदची अनेक ठिकाणी बेनामी संपत्ती आहे. दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. हसिना पारकर आणि नवाब मलिक याचां संबंध आहे. नवाब मलिकांचा संबंध थेट अंडरवर्ल्डशी आहे. दाऊदशी संबंधित सात ठिकाणच्या संपत्तीचे मालक हे नवाब मलिक आहेत. डी गँगशी संबंधित संपत्ती मलिकांच्या कुटुंबियांनी खरेदी केली आहे.


अंडरवर्ल्डशी संबंध, त्यांच्याशी संबंधित पैशाचा वापर करणे, हा पैसा परदेशात पाठवणाऱ्या कंपनीशी संबंध असणे या आरोपाखाली ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. या प्रकरणी सर्व पुरावे न्यायालयात मांडण्यात आले आहेत. त्यानंतर सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 


नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. आता नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचं मानण्यात येतंय. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत. दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात नवाब मलिक यांचाही सहभाग असल्याचा पुरावे सापडले असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ईडी अधिकारी नवाब मलिक यांचे घरी दाखल झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांच्या भावाला ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, नवाब मलिक यांना समन्स देण्यात आले नव्हते.


काय आहे नेमकं प्रकरण? 
मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. आज मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. 


संबंधित बातम्या: