मुंबई: दाऊद इब्राहिमशी संबंधित जमिनीचा व्यवहार प्रकरणी ईडीने राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता नवाब मलिक आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. नवाब मलिक आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या  कार्यालयात वरिष्ठ मंत्र्यांची बैठक सुरु आहे. यामध्ये नवाब मलिकांना ईडीकडून अटक करण्यात आलेल्या अटकेवर यामध्ये चर्चा सुरू आहे. 


ईडीकडून अटक झाल्यानंतर आता विरोधकांकडून नवाब मलिकांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याची शक्यता लक्षात घेता नवाब मलिक राजीनामा देण्याची शक्यता आहे. मलिकांनी जर राजीनामा दिला तर त्यांच्या खात्याचा पदभार जितेंद्र आव्हाड किंवा हसन मुश्रीफ यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.


दरम्यान, मंत्रालयात राष्ट्रवादीची बैठक सुरू असून यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, राजेश टोपे उपस्थित आहे.  नवाब मलिक यांच्या अटक प्रकरणी चर्चा सुरु आहे.


नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा- चंद्रकांत पाटील
राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर आता त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसून त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 


दरम्यान, नवाब मलिकांच्या अटकेनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती आहे. 


काय आहे नेमकं प्रकरण? 
मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.


दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरला ईडी कोठडी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला शुक्रवारी सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे. याप्रकरणी ईडीने इक्बाल कासकरला अटक केली होती. शुक्रवारी इक्बाल कासकरला विशेष मुंबईतील विशेष पीएमएलए  कोर्टात हजर केलं होतं. यावेळी कोर्टाने इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.