नाशिक : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली आहे. परमवीर सिंग यांच्या विरोधात नाशिकच्या आडगाव पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती कायद्याअंतर्गत नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शामकुमार निपुंगे यांनी 14 जून रोजी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी केली आहे. यासंदर्भात नाशिक पोलीस आयुक्तांना पत्र लिहून पोलिसांकडून कायद्याचे उल्लंघन केले जात असून तात्काळ कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. 


तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांचा खंडणीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याविरोधात नाशिक पोलिस, डिजी कार्यालयापासून तर थेट गृहमंत्री आणि मुख्यमंत्रीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार करणारे पोलीस दलातीलच उच्च पदस्थ अधिकारी शामकुमार निपुंगे आहेत. निपुंगे सध्या नाशिक ग्रामीण पोलीस दलात उपअधीक्षक पदावर कार्यरत असून त्यांची 3 महिने सर्व्हिस बाकी आहे. पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवारच्या आत्महत्या प्रकरणात आपल्याला अडकविण्याच षड्यंत्र तत्कालीन ठाण्याचे आयुक्त परमवीर सिंग यांनी रचल्याचा आरोप निपुंगे यांनी केला. पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार, सूरज परमार आणि मनसुख हिरेन या तिन्ही वेगवेगळ्या प्रकरणात आत्महत्या झाल्याचं दाखविण्यात आलं असून ती आत्महत्या नाही खून असल्याचा आरोप शामकुमार निपुंगे यांनी केलाय. सुभद्रा पवार आणि मनसुख हिरेन यांचे पीएम करणारे घाडगे नावाचे एकच डॉक्टर असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे आत्महत्या दाखविण्यामागचं कारण काय त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी एबीपी माझाशी बोलताना केली आहे.


आरोपांचे कारण


सन 2017 साली शामकुमार निपुंगे भिवंडीला वाहतूक शाखेचे एसीपी होते. त्यावेळी पोलीस मुख्यालयातील कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिचा खून झाला होता. मात्र तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं भासविण्यात आलं. त्या आत्महत्येला आपल्याला जबाबदार धरण्यात आल्याचा आरोप निपुंगे यांनी केला आहे. सुभद्रा पवारचा खून प्रियकर पोलीस कॉन्स्टेबल अमोल फापाळे याने केला असून परमवीर सिंग यांच्या सांगण्यानुसार बनावट कागदपत्रे तयार करून आपल्याला अडकविण्यात आल्याचा दावा निपुंगे यांनी केलाय. सुभद्रा आपल्या बहिणीच्या गावातील असल्यानं तिच्याशी बोलणे होत होते पण या प्रकरणात अडकविण्यात आले.
यासंदर्भात परमवीर सिंग यांचे जवळचे मानले जाणारे क्राईम ब्रँचचे सहायक पोलिस आयुक्त निवृत्ती कदम यांचे स्टिंग निपुंगे यांनी केले असून पुरावा म्हणून ते सबंधित यंत्रणांना सादर केले आहे.  "यात कदम आणि निपुंगे यांचे संभाषण असून सुभद्रा पवार, सूरज परमार यांची आत्महत्या नसून खून असल्याचा दावा कदम करत आहेत. परमवीर सांगतील तसे  खोटं बिट करून खालच्या कर्मचाऱ्यांना एकावे लागत असल्याचा उल्लेख ही कदम यांच्या तोंडी आहे."


शामकुमार निपुंगे 2017 मध्ये भिवंडीला वाहतूक शाखेचे एसीपी होते, तेव्हा परमवीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त होते, तर रमेश भामे हे नारपोली वाहतूक विभागात पोलीस निरीक्षक होते, भामे यांनी परमवीर सिंग यांच्याशी मोठी देवाणघेवाण करून एक कोटी रुपये देऊन नारपोली विभागात नेमणूक घेतली होती, त्यामुळे ते माझे आदेश ऐकत नव्हते.  या भागात वाहतूक विभागात मोठा गैरप्रकार सुरू होता त्याला मी पायबंद घालत होतो, तरीही वाहतूक शाखेचे उपायुक्त काळे, भामे आणि परमवीर सिंग यांनी संगनमताने जड वाहनांना दिवसा परवानगी नसतानाही बेकायदेशीरपणे सर्रास परवानगी देत अवजड वाहनचालकाकडून पैसे लाटले. पाचशे ते हजार रुपये घेऊन फक्त दोनशे रुपयांची पावती देण्यात आली. या कामाला मी विरोध केल्यानं माझ्या विरोधात सूड उगविण्यात आल्याचा शामकुमार निपुंगे यांचा दावा आहे. नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीला परमवीर सिंग आणि इतर अधिकारी जबाबदार होते. सन 2017 मध्ये 1 लाख 62 हजार 70 वाहनांवर तर 2016 मध्ये 1 लाख 85 हजार 191 वाहनांवर कारवाई करण्यात आली. मात्र ती कायदेशीर केली असती तर सरकारला मोठा महसूल मिळाला असता. या कामात लक्ष घातल्याने वाहतूक शाखेतून मुख्यालयात बदली करण्यात आल्याचा निपुंगे यांचा दावा आहे. सुभद्रा आत्महत्या प्रकरणात प्रियकर अमोल फापाळे बरोबर सहआरोपी केल्यानं निपुंगे यांना सहा ते सात महिने जेलची हवा खावी लागली आहे. आपल्या विरोधात कट कारस्थान रचण्यात इतरही वरिष्ठ अधिकाऱ्याचा सहभाग असून त्यांच्यावर करावाई करून न्याय मिळावा अशी मागणी निपुंगे यांनी केली आहे.