मुंबई : भाजपचे 12 आमदार काल निलंबित करण्यात आले. त्या 12 आमदारांचं वागणं अतिशय चुकीचं होतं. ते वेलमध्ये गेले हे आम्ही पाहिलं आहे. तालिका सभेचे अध्यक्ष भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे की, त्यांना धक्काबुक्की झाली, शिवीगाळ झाली. सरकारची कोंडी करण्याचा एक वेगळा प्रयत्न त्यांच्याकडून सुरु होता. परंतु त्यांची 'केले तुका झाले माका' या म्हणी प्रमाणे परिस्थिती झाली आहे. ते आमच्यावर बॉम्ब टाकत होते परंतु बाँब त्यांच्या हातातच फुटला. एक चूक किती महागात पडू शकते, बेशिस्त वर्तन महाराष्ट्रात चालत नाही हे परत एकदा सिद्ध झालं आहे अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी 12 आमदारांच्या निलंबनावर दिली आहे. 


संजय राऊत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचं एक जजमेंट आहे ज्यामध्ये कोर्टाने नमूद केलं आहे की, आमदारांचं किंवा खासदारांचं आशा प्रकारचं वर्तन सहन करता कामा नये. 12 आमदारांचं निलंबन हा शिस्तीचा भाग आहे. जर कारवाई केली नाही तर सभागृहात दंगली होतील, जे आम्ही पाकिस्तानच्या सभागृहात पाहिलं आहे. बिहार, उत्तरप्रदेशच्या सभागृहात आम्ही हे पाहिलं आहे, तिथं दंगली उसळल्या आहेत. महाराष्ट्रात अशी परंपरा पडू नये यासाठी आशा प्रकारचा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. 


दरम्यान, बेळगाव आणि महाराष्ट्र सीमेवर तणावाचं वातावरण आहे. बेळगाव महापालिकेवर लाल पिवळा झेंडा काल लावण्यात आला आहे. या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही त्यांची पिवळी केल्याशिवाय राहणार नाही. मी पुन्हा एकदा बेळगावला चाललो आहे. जर कुणाला गोंधळचं घालायचा असेल तर बेळगावच्या प्रश्नी संसदेत किंवा संसदेच्या बाहेर गोंधळ घालावा. त्यासाठी चांगला वाव आहे. काल राज्याच्या विधानसभेत जो गोंधळ घालण्यात आला आणि माईक तोडण्याचा जो प्रकार घडला तो निषेधार्ह आहे. 


बेळगाव महापालिकेसमोर नेमकं काय घडलं? 
बेळगाव महापालिकेसमोर पुन्हा एकदा लाल पिवळा ध्वज लावण्याचा प्रयत्न केला गेला. कन्नड रक्षण वेदिकेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं. लाल पिवळा ध्वज लावण्यावरून बेळगाव मध्ये पुन्हा एकदा तणाव पाहायला मिळत आहेत. ध्वज फडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याआधी लावलेला लाल पिवळा ध्वज खराब झाल्याचे कारण देत नवीन ध्वज फडकवण्याचा कन्नड रक्षण वेदिकेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. अनधिकृत ध्वजावरुन गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात तणावाचं वातावरण आहे. त्यात कालच्या प्रकाराने अजून तणावात वाढ झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करुन तणाव शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.


महत्वाच्या बातम्या :